Lalit Patil escape
Drug Mafia Lalit Patil Case

  पुणे/अक्षय फाटक : ससून ड्रग्ज कारवाईनंतर उपचार घेत असताना ससून रुग्णालयातून पळालेल्या ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून येथील त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केली आहे. त्यादिवशीच्या संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
  दोन कोटी १४ लाखांचे ड्रग्ज पकडत मोठे रॅकेट उघडकीस
  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटी १४ लाखांचे ड्रग्ज पकडत मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. यानंतर उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल असताना ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणारा ललित पाटील कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी पळून गेला. तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एक्सरे काढण्यासाठी घेऊन जात असताना तो झटका देऊन पळाला, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच माहिती समोर आली.
  साडेसहाच्या सुमारास ललित पाटील हा तेथून गायब झाला होता. यानंतर साडेदहा वाजता संबंधित कर्मचाऱ्यांनी ललित पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी हलगर्जी व निष्काळजीपणा केल्याने नुकतेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.
  पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरू

  आता पुणे पोलिसांकडून या संबंधिताचा तपास सुरू केला असून, पोलिसांनी ललितवर उपचार करणाऱ्या पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये तीन डॉक्टर तसेच काही कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात वरिष्ठ डॉक्टर, लेक्चरर, एक्सरे तंत्रज्ञ आदींची चौकशी झाली आहे.

  ससूनसह जेलप्रशासन संशयाच्या भोवऱ्यात
  ललित पाटीलप्रकरणात पुणे पोलिसांचा कोर्ट कंपनीचा कारभार, ससून रुग्णालयातील सावळा गोंधळ अन् कारागृह विभाग हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आतापर्यंत पोलिसांच्या तपासात कोर्ट कंपनीतील तब्बल दोन अधिकाऱ्यांसह ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर, ललित पळाला तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. दुसरीकडे शासनाने नेमलेल्या ससून रुग्णालयाच्या चौकशीत एका डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, आता पुणे पोलिसांचा तपास ससून रुग्णालयापर्यंत गेला आहे. पोलिसांच्या चौकशीत रुग्णालयातील कोणी ललितवर मेहरबान असल्याचे निदर्शनास आल्यास थेट कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससूनचे धाबे दणाणले आहेत.