नाफेडच्या कांदा खरेदीत गैरप्रकार; अत्यंत गोपनीय पद्धतीने होणाऱ्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत असून त्याची तातडीने चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्य‍ाना पाठवलेल्या पत्रात केली आहे(Inquiry into NAFED's onion purchase).

  पुणे : कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत असून त्याची तातडीने चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्य‍ाना पाठवलेल्या पत्रात केली आहे(Inquiry into NAFED’s onion purchase).

  सकारने मूल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर वेगवेगळे आहेत. नाफेडने काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संघांना कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या नेमण्याची जवाबदारी दिली.

  व्यापाऱ्यांकडूनच खरेदीचा आरोप

  नाफेड मार्फत किमान 15 रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जाईल ही अपेक्षा होती मात्र कांदा खरेदी दहा रुपये किलो दरा पेक्षा ही कमी दराने होत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून नावापुरता कांदा खरेदी केला जात असून बाकी कांदा व्यापाऱ्यांकडूनच खरेदी केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. आता स्वस्तात खरेदी केलेला कांदा पुढे जास्त दराने खरेदी केला असे रेकॉर्ड तयार करून शासनाला लुटण्याचे प्रकार मागील खरेदीच्या वेळेस झाले होते व या वेळीही होतील अशी शंका घनवट यांनी व्यक्त केली आहे.

  दरात घसरण सुरुच

  कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कांदा लिलावात प्रतिकिलो एक ते दोन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाल्यानंतर दिवसागणिक दरात कमालीची घसरण होत आहे. एक नंबर कांदा 900 रुपये प्रति क्विंटल तर दोन आणि तीन नंबरचा कांद्याला अवघा दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.