मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची अधिकाऱ्यांकडून तपासणी; संजय राऊतांच्या आरोपानंतर आयोग ॲक्शनमोडवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. 

    नाशिक : लोकसभा निवडणूकीची रंगत वाढली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार असून त्याचा जोरदार प्रचार सुरु आहे. नाशिक आणि दिंडोरी येथील मतदान पाचव्या टप्प्यामध्ये होणार असल्यामुळे नाशिकमध्ये नेत्यांचे दौरे वाढले आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभांचे सत्र वाढले असून निवडणूक आयोग देखील ॲक्शन मोडवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.

    नाशिकमध्ये आज निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. ते आज हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. त्यांच्यासोबत दोन मोठ्या बॅगा होत्या. मुख्यमंत्री उतरल्यानंतर लगेचच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

    संजय राऊत यांचा आरोप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आले आहेत. मागच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते त्यामुळे ते नाशिकमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक बॅगा होत्या. या बॅगांमध्ये पैसे भरुन आणल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. हेलिकॉप्टरमधून पैसे वाटप करण्यासाठी आणत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यामधून ठाकरे गट व महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.