‘अग्निपथ’च्या निषेधार्थ सोलापुरात तीव्र आंदोलन; युवा महासंघाचे कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट

अग्निपथ ही योजना (Agnipath Scheme) देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत आहे. याची दखल सरकार घायला तयार नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने कोणत्याही परिस्थितीत ही योजना मागे घेतलीच पाहिजे.

    सोलापूर : अग्निपथ ही योजना (Agnipath Scheme) देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत आहे. याची दखल सरकार घायला तयार नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने कोणत्याही परिस्थितीत ही योजना मागे घेतलीच पाहिजे. अन्यथा हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होणार असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम (Anil Wasam) यांनी दिला.

    डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीच्या वतीने सोमवारी सकाळी अकरा वाजता केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळून अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले.

    यावेळी पूनम गेट परिसरात पोलिसांचा प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेव्हा युवा महासंघाचे सर्व कार्यकर्ते एकत्र जमून अग्निपथ योजनेच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडले. त्यानंतर कार्यकर्ते नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दडपशाही करून प्रतिमा जाळण्यास अटकाव केला. तरीही सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिमा फाडून घोषणाबाजी केली. तेव्हा जमाव आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली. धक्काबुक्की झाली.

    अखेर सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी युवा महासंघाच्या 16 जणांना ताब्यात घेत कारवाई केली. यामध्ये विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण, अकील शेख, सनी कोंडा, नरेश गुलापल्ली, मधुकर चिल्लाळ, आसिफ पठाण, राहुल बुगले, मोहसीन शेख, सद्दाम बागवान, कुमार येलगेटी, नितीन माकम, योगेश आकिम, बालाजी गुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.