२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

२०२४ च्या विधानसभा निवडणुका पाहता शिंदे आणि भाजप सरकार युद्ध पातळीवर विकासकामांचे निर्णय घेत असून त्यासाठी खास वॉर रूम तयार करण्यात आली आहे. यात समृध्दी महामर्गासह एमएमआरमधील अनेक महत्वाचे प्रोजेक्ट असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.

    नवी मुंबई : निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport) २०२४ मध्ये कार्यान्वित होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी रविवारी सांगितले. ते मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) येथे बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा चर्चेत आला आहे. तर सिडकोपुढेदेखील (CIDCO) आता डेडलाईनचे (Deadline) आव्हान उभे ठाकले आहे.

    २०२४ च्या विधानसभा निवडणुका पाहता शिंदे आणि भाजप सरकार युद्ध पातळीवर विकासकामांचे निर्णय घेत असून त्यासाठी खास वॉर रूम तयार करण्यात आली आहे. यात समृध्दी महामार्गासह एमएमआरमधील (MMR) अनेक महत्वाचे प्रोजेक्ट असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे.

    नवी मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत १९९७ मध्ये नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि २००७ मध्ये त्याला सरकारने मान्यता दिली होती. प्रकल्पात जमीन संपादन करण्यास विलंब झाला. याआधी महाआघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनीही नवी मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सुरू असलेले काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते.

    २०२४ पर्यंत ग्रीनफिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडल्यावर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनणार आहे. या विमानतळाच्या उभारणीनंतर अदानी समूहाकडे एकूण आठ विमानतळे होतील. प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने मुंबई विमानतळ हे भारतातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

    व्यवस्थापन आणि विकास पोर्टफोलिओमध्ये आठ विमानतळांसह, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लि. (AAHL) आता भारतातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी बनली आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पायाभरणी केली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ३७०० मीटरच्या दोन समांतर धावपट्टी आणि १५५० मीटरच्या पूर्ण लांबीच्या टॅक्सीवेसह जगातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक म्हणून ओळखले जाते.