घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळींचा पर्दाफाश; तीन आरोपींना मध्यप्रदेश मधून अटक, ९ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

  अलिबाग : निर्जन वस्तीतील घरांची रेकी करून तिथे घरफोडी करणाऱ्या, एका आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशातील दुर्गम भगातून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

  ९ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

  त्यांच्याकडून ९ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. २७ जुलै २०२३ रोजी रोहा पोलीस ठाणे हद्दीत भुवनेश्वर येथे एका निर्जन बंगल्यात चोरी झाली होती. घरातून ३० तोळे सोनं आणि अर्धा किलो चांदीची भांडी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आपल्या चोरट्यांविरोधात भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  चोऱ्या आणि घरफोड्या यांचे वाढते प्रमाण

  चोऱ्या आणि घरफोड्या यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

  तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास

  तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. या पुराव्यांचे विश्लेषण करून आरोपी निश्चित करण्यात आले. हे आरोपी मध्य प्रदेश येथील धार जिल्ह्यातील दुर्गम भागातील असल्याचे दिसून आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आली.

  पोलिसांकडून मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत

  आरोपी अतिदुर्गम भागातील असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी घेतला. यानंतर कैलास कमरू डावर वय २६, निहालसिंग गोवन सिंग डावर वय ४०, सोहबत इंदर सिंग डावर वय ३६ या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीनंतर त्यांनी घोरफोडी केल्याची कबुली दिली. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी शंभर टक्के हस्तगत केला.

  या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस हवालदार अमोल हंबीर , प्रतीक सावंत जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक विशाल आवळे, सचिन वाडेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटी, अक्षय सावंत, आणि सायबर सेलचे तुषार घरत, आणि अक्षय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तीनही आरोपींना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.