शादी डॉट कॉमवरील ओळख पडली महागात; व्यावसियाकाची तब्बल २५ लाखांची फसवणूक

शादी डॉटकॉम साईटवर झालेली ओळख एका ५१ वर्षीय व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली असून, त्या तरुणीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवत तसेच वेळोवेळी भेटत त्यांचा विश्वास संपादन करून २५ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

    पुणे : शादी डॉटकॉम साईटवर झालेली ओळख एका ५१ वर्षीय व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली असून, त्या तरुणीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवत तसेच वेळोवेळी भेटत त्यांचा विश्वास संपादन करून २५ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील तरुणीने त्यांना गंडा घातला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
    केवळ पाच महिन्यात तिने २५ लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी ५१ वर्षीय तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, खुशबू जैसवाल (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा पुण्यात व्यावसाय आहे. दरम्यान, त्यांनी शादी डॉटकॉमवर नोंदणी केली होती. तेव्हा त्यांची खुशबू जैसवाल या तरुणीशी त्यांची ओळख झाली. त्यांच्यात प्रथम बोलणे सुरू झाल्यानंतर खुशबूकडे त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही त्यांना सहमती दर्शवली. दरम्यान, ते फोनवर बोलत असत. तक्रारदारांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ते पुणे, कोलकत्ता तसेच दिल्ली या शहरात भेटले देखील. अधून-मधून ते भेटत असत. याचवेळी खुशबूने कौटुंबिक अडचण, वैद्यकीय उपचारांच्या बहाणा केला.
    तसेच, त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे देत तिने तब्बल २५ लाख ६६ हजार २२६ रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर मात्र, तिने तक्रारदारांशी संपर्क तोडला आणि मोबाइलही बंद केला. तेव्हा तक्रारदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे तपास करत आहेत. दरम्यान, हा प्रकार जुलै २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. केवळ पाच महिन्यात तिने तक्रारदार यांना गंडा घातला आहे.