Solapur ZP
Solapur ZP

माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी लांबविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखापरीक्षक मीनाक्षी वाकडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  सोलापूर / शेखर गोतसुर्वे : माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची चौकशी लांबविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखापरीक्षक मीनाक्षी वाकडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचा पदभार प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक विठ्ठल ढेपे यांना देण्यात आला होता. या काळात त्यांनी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर फरक बिले काढली. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप एका शिक्षक संघटनेने केला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ढेपे यांच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्य लेखापरीक्षक मीनाक्षी वाकडे यांना दिले होते.

  याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक संजय बाणूर यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करून प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सीईओ आव्हाळे यांच्याकडे अहवाल सादर केला होता. परंतु मुख्य लेखा अधिकारी वाकडे यांनी ढेपे यांची चौकशी केलीच नसल्याचे दिसून आले आहे. तक्रारीनंतर या संघटनेने परत ढेपे यांच्याविरुद्ध माघार घेतली होती त्यामुळे ही तक्रार थांबणार का? अशी चर्चा सुरू झाल्यावर सीईओ आव्हाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत ढेपे यांची चौकशी होणारच असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

  त्यानंतर याबाबत वाकडे यांनी तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे ढेपे यांचे दप्तर मागितल्याचे कारण सांगितले जात आहे. पण ते दप्तर उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली आहे. त्यामुळे मार्चअखेर कामाचा आढावा घेत असताना ढेपे यांची चौकशी लांबल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी वाकडे यांना कारणे दाखवा नोटीस काढल्याचे प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. चौकशी लांबवून ढेपे यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होत असल्याचीही जिल्हा परिषदेत चर्चा रंगली आहे.

  पताळे यांची चौकशी?

  दरम्यान समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता पताळे यांचा पदभार काढण्यात आला आहे. पताळे यांनी आपणहून पदभार सोडणार असल्याचे पत्र 26 मार्चला शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते, असे कारण सांगितले आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी असे कोणतेही पत्र मला अद्याप मिळाले नाही, वरिष्ठांच्या आदेशानुसार पताळे यांचा पदभार काढण्याचा अहवाल सादर केल्याचे स्पष्ट केले. पताळे यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी होत्या. त्यामुळे आता त्यांची चौकशी होईल? असे बोलले जात आहे.

  आरोग्यात मनमौजी…

  आरोग्य विभागाचे माध्यम अधिकारी म्हणून नव्या अधिकाऱ्याने पदभार घेतला आहे. या अधिकाऱ्याचा कारभार मनमौजी सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अभियानाची जाहिरात सीईओ व डीएचओ यांच्या नावे करणे अपेक्षित असताना नव्या माध्यम अधिकार्‍यांनी स्वतःचा फोटो टाकून जाहिरातबाजी सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.