नेत्यांचा वाढदिवस,  कुटुंबीयांचा आक्रोश ! देसाई कारखान्याचा बेजाबाबदारपणा वीज कर्मचाऱ्याच्या मुळावर

- भरघोस मदत मिळणार ?

  पाटण:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त कारखाना परिसरात विद्युत रोषणाई करताना विजेच्या खांबावर चढलेला कारखान्यातील वीज कर्मचारी विशाल अशोक यादव (वय २४, रा. साईकडे, ता. पाटण) याला विजेचा शॉक लागून तो खांबावरच मृत पावल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. कारखान्याचा बेजबाबदारपणा या वीज कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठला असून एका बाजूला नेत्यांचा वाढदिवस  तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश असे विदार चित्र निर्माण झाले आहे. या कुटुंबीयांना पालकमंत्री देसाई भरीव मदत करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
  हल्ली वाढदिवस साजरे करण्याचे फ्याडच निर्माण झाले आहे. लहान मुलांचा वाढदिवस साजरा करणे, हे आपण समजू शकतो. मात्र कार्यकर्त्यांना ऊर्जीत अवस्थेत ठेवण्यासाठी नेतेमंडळीचा हल्ली जंगी वाढदिवस साजरे करण्याची पद्धतच रूढ झाली. या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागलेले असतात. प्रत्येक जण आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी धडपडत असतो. याच पार्श्वभूमीवर नुकतेच महाविकास आघाडीतून शिंदे गटात उडी मारलेले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच्या जंगी तयारीसाठी पाटण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आज हा वाढदिवस मोठ्या दिमाखदार सोहळ्याने साजरा होत आहे. परंतु, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर मात्र दुखावटा आहे. नेत्यांच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी कारखाना स्थळावर सुरू असलेल्या विद्युत रोषणाईची तयारी येथील कारखाना वीज कर्मचाऱ्यांच्या जीवितावर बेतली आहे.  कारखाना परिसरासह साईकडे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यानंतरही मृताच्या वारसाला भरघोस मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही. त्याचबरोबर मृतेदह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने पाटणच्या रुग्णालय परिसरात काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
  पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा बुधवार दि. १७ रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची कारखानास्थळावर पूर्वतयारी करण्याची लगबग सुरू असतानच मंगळवार दि. १५ रोजी कारखान्यातील वीज कर्मचारी विशाल यादव हा परिसरातील विजेच्या पोलवर चढला होता. त्याला अचानक विजेचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ मृतदेह खांबावरच लटकत होता.  या घटनेने एकच खळबळ उडाली.
  ग्रामीण रुग्णालयात गोंधळ…
   पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी विशाल यादव याचे नातेवाईक व मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांनी पाटण ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. दोषींवर गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर कुटुंबियांना तातडीने भरघोस मदत जाहीर करावी, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
  देसाईंची १ लाखाची मदत नाकारली….
  दोषी आढळतील त्यांच्यावर  निश्चितच कारवाई केली जाईल, असेे सांगून कारखान्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना तातडीची १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र यावर उपस्थित ग्रामस्थांनी ती नाकारत किमान दहा लाख रुपयांची मदत वारसांना जाहीर करा, अन्यथा मृतदेहाचे शवविच्छेदन व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांना सांगितले. तद्‌नंतर ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने मृतदेह कारखानास्थळावर घेवून जाण्याचा पवित्रा घेतल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
  आकस्मिक मृत्यूची नोंद…
  मयत विशाल अशोक यादव हा गेल्या तीन ते चार वर्षापासून कारखान्यात वायरमन म्हणून काम करत असून अविवाहित आहे. दरम्यान, या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद मल्हारपेठ पोलीस स्टेशनमध्ये झाली असून उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

  लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना हा वीज कंपनीचा ग्राहक आहे. या कारखान्याच्या मीटरपर्यंत वीज देण्याची आमची जबाबदारी आहे. कारखाना परिसरातील तसेच कारखान्यातील वीज दुरुस्ती अथवा अन्य कामांसाठी कारखान्याचा स्वतंत्र इलेक्ट्रिक विभाग काम करतो. त्यासाठी इंजिनियर तसेच वीज कर्मचारी ही नियुक्त केलेले असतात. त्यामुळे नेमकी काय घटना घडली हे कारखान्याचा इलेक्ट्रिक विभागच सांगू शकेल.

  - किशोर शिंदे, उपकार्यकरी अभियंता पाटण