सिंचन, विजेच्या पाणी वापरात कपात! कोयना धरणात पाणी कमी असल्यामुळे जलसंपदा विभागाचा निर्णय

चालु वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

  सातारा : चालु वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

  कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५  टी.एम.सी. आहे. चालू वर्षी पावसाळी हंगमापूर्वी दि. १ जून २०२३ रोजी धरणामध्ये एकूण १७.६४ टी.एम.सी. पाणी साठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मि.मी. व पाणी आवाकमध्ये ३९.७१ टी.एम.सी. इतकी घट झाली आहे.दि. १ जून ते १४ ऑक्टोंबर २०२३ या दरम्यान सिंचन व वीज निर्मितीसाठी अनुक्रमे ५.४६ टी.एम.सी. व २३.०३ टी.एम.सी. वापर  झाला आहे.

  कोयना धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टी.एम.सी. वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. त्यापैकी दि. १ जुलै ते १४ ऑक्टोंबर २०२३ या खरीप हंगामामध्ये ४.३९ टी.एम.सी. पाणीवापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. कोयना प्रकल्पांतर्गत सिंचीत होणारे बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातील असल्याने सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी धरणामधून विसर्ग सोडण्यात येतो. मागील वर्षी कोयना धरणातून खरीप हंगामामध्ये झालेला पाणीवापर ०.४७ टी.एम.सी. इतका मर्यादित होता. तथापी चालू वर्षी खरीप हंगामामधील ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाकडून मागणी प्राप्त झाल्यामुळे कोयना धरणामधून २.३६ टी.एम.सी. इतके पाणी सोडण्यात आले आहे. गत वर्षी पेक्षा २ टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे.

  धरणामधील उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात ११.७१ टी.एम.सी. प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टी.एम.सी. व वीज निर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टी.एम.सी. पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार मुख्य अभियंता (ज.सं.), जलसंपदा विभाग, पुणे यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीज निर्मितीसाठी एकूण ७० टी.एम.सी. इतका मर्यादेत पाणीवापर करणेबाबात सूचित केले आहे.

  रब्बी व उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे नियोजनाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यतेक्षाली  दि. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आयोजित बैठकीमध्ये कोयना धरणामधून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये सिंचन व वीज निर्मितीसाठी होणार पाणी वापर प्रत्येकी ३५ टी.एम.सी.च्या मर्यादेत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

  ३२ टीएमसी मर्यादेत पाणीवापर
  कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ टीएमसी व १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापी उपरोक्त नमुद कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यासाठी ३ टीएमसी व सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करणे नियोजित आहे.

  रब्बी हंगामात १.४२ टी.एम.सी. वापर
  मागील वर्षी दि. १५ ऑक्टोंबर ते २२ नोव्हेंबर २०२२ दरम्यान रब्बी हंगामामध्ये १.४२ टी.एम.सी. पाणीवापर झाला होता. दरम्यान उपरोक्त सिंचन नियोजनाच्या अनुषंगाने चालू वर्षी रब्बी हंगामामधील ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणामधून २ टी.एम.सी. पाणी यापूर्वीच सोडण्यात आले आहे.