‘असं’ हिंदुत्व भाजप आणि संघाला मान्य आहे काय? उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना वाक्बाणाचे फटकारे

महिलेला मारहाण करणे हे असे हिंदुत्व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप, उपमुख्यमंत्री यांना मान्य आहे काय? त्या महिलेची तक्रार घेण्यासही पोलीस तयार नाहीत, अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री फडतूस नाही तर काय आहे. मातृत्वासाठी उपचार घेणाऱ्या महिलेच्या पोटात लाथा बुक्के मारणे, हे त्यांचे हिंदुत्व आहे काय? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

    नागपूर : भाजपविरोधात (BJP) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली वज्रमूठ घट्ट केली असून भाजपच्या बालेकिल्ल्यातली ही विराट जाहीर सभा आज दणक्यात पार पडली. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे शैलीत विरोधकांना आपल्या वाक्बाणांनी घायळ करत चांगलेच फटकारे मारले आहेत. राज्याची उपराजधानी नागपुरात (Nagpur) त्यांनी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government), भाजप आणि मिंधे गटाचा (Shinde Group) खरपूस शब्दात समाचार घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

    लोकशाही टिकवायची असेल तर वज्रमूठ आवळत एकत्र या. खुर्च्या सोडल्या तरी, यातील काहीही भाड्याचे नाही. यांच्या बुरख्याआडचा त्यांचा भेसूर चेहरा आता ओळखा. वज्रमूठ आवळण्याची हिंमत दाखवणार का, आता जिंकेपर्यंत लढायचे, हा निर्धार आम्ही केला आहे.ज्यांना मिळाला त्यांच्या शिध्याला बुरशी लागलेली आहे. त्यांच्या कारभारालाच बुरशी लागली आहे.

    राज्य सरकारचा आनंदाचा शिधा कोणाला मिळाला आहे. सर्व आलबेल असल्याचे दाखवण्यात येत आहे, मात्र तसे काहीही नाही. किती जणांना केंद्र सरकारी योजना मिळत आहे, त्या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात. आम्ही तुम्हाला सत्ता देतो, फक्त आठ वर्षात काय केले ते सांगा, असे आव्हान त्यांनी दिले.

    गद्दारांना घेत तुम्ही सरकार चालवत आहात, ही सत्तेची नशा नाही तर काय आहे. सैनिक देशासाठी लढतात, ते पक्षासाठी लढत नाहीत. कारगिल युद्धानंतर तिन्ही दलातील प्रमुखांचे पोस्टर भाजपच्या सभेत लावले जात होते.सत्यपाल मलिक यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे, त्याची तरी ते दखल घेणार आहेत का?

    यांना पर्याय कोण हा विचार करण्याची वेळ का आली आहे, त्यांना पर्याय कोणीही असेल. पण जनतेचे नुकसान करणारे आता सत्तेवर नकोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांना प्राणांचे बलिदान केले, आता तुम्हाला एका बोटानेच क्रांती करायची आहे.देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणारे क्रांतीकारक हे सत्तेवर बसावे म्हणून बलिदान केले नव्हते.

    हे असे हिंदुत्व यांना मान्य आहे काय?

    हे असे हिंदुत्व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप, उपमुख्यमंत्री यांना मान्य आहे काय? त्या महिलेची तक्रार घेण्यासही पोलीस तयार नाहीत, अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री फडतूस नाही तर काय आहे. मातृत्वासाठी उपचार घेणाऱ्या महिलेच्या पोटात लाथा बुक्के मारणे, हे त्यांचे हिंदुत्व आहे काय?

    रोशनी शिंदे या महिलेवर दिवसाढवळ्या हल्ला करतात. तिला लाथाबुक्कांनी मारहाण करण्यात आली. ते मदरशात जाणार, मन की बात करणार, कव्वाली करणार, हे त्यांचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, त्यांचे हिंदुत्व काय आहे, ते त्यांनी जाहीर करावे. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. त्यांचे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे.

    मर्द असाल तर मैदानात या

    आपण काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असे म्हणता, आम्ही काय सोडले ते सांगा. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये, म्हणून काड्या का करता त्यावेळी भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. बाबरी मशीदीच्या वेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब गेले नव्हते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले, ही बाप चोरणाऱ्यांची औलाद आहे, ते जनतेला मुलाप्रमाणे काय सांभाळणार. राज्यात येणारे उद्योगधंदे यांनी गुजरातला पाठवले. आता आमच्यावर आरोप करत आहेत. कोठूनही काम करा, पण जनतेला काय पाहिजे ते द्या, फक्त भूलथापा देऊ नका.

    मी घरात बसून कारभार केला, तरी देशात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आपला क्रमांक होता. यांचा अयोध्या दौरा सुरू होता आणि राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. नळ्यासोबत गाड्याची यात्रा, याप्रमाणे उपमुख्यमंत्रीही अयोध्येला गेले होते.

    … तर आधी अयोध्येला गेले असते

    यांच्यात हिंदुत्व असते तर ते आधी सूरत किंवा गुवाहाटीला गेले नसते, आधी अयोध्येला गेले असते. राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्यावर हे टिकोजीराव आम्हीच केले असा डांगोरा पिटत आहे.

    हे उलट्या पायाचे सरकार

    महाराष्ट्र हा शूरांचा वीरांचा आहे, पाठीत वार करणाऱ्यांचा नाही,पाठीत वार करण्याची आमची पंरपरा नाही. आमचे सरकार नालायक असते, तर एवढ्या मोठ्या संख्येने जनता आलीच नसती,हे उलट्या पायाचे सरकार आहे. त्यांनी आम्हाला फसवले म्हणून ही आघाडी झाली आहे. घटना बचाओ नसून आता घटनेच्या रक्षणासाठी मी पुढाकार घेणार, घटनेचे रक्षण मीच करणार, हा निर्धार करा.एक महामानव देशासाठी घटना लिहू शकतो. तर एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलो तर घटनेचे रक्षण करू शकतो.

    भारतमातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू आहे. देशाच्या विकासाचा क्रमांक घसरत आहे, मात्र, त्यांच्या मित्राच्या श्रीमंतीत वाढ होत आहे. सत्तेची नशा आणि व्यसन खूप धोकादायक आहे, हे दिसून येत आहे.

    समाजसेवा करणाऱ्यांसमोर झुकावेच लागते

    अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचे व्यसनमुक्तीचे कार्य खूप मोलाचे आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी त्याला समाजसेवा करणाऱ्यांसोमार झुकावेच लागते. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवले.