खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की खून झाला हे तपासणे गरजेचे, महाजनांचे खळबळजनक वक्तव्य

महाजन म्हणाले की, ते माझ्या मुलाबाळांवर जात असतील, तर आमदार एकनाथ खडसेंना एक मुलगा होता. ३२ व्या वर्षी त्याला काय झाले? कुणामुळे झाले, हा ही संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना जास्त झोंबेल. तुमच्या मुलाचे काय झाले? आत्महत्या झाली की खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच तुमचे भले असल्याचे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले.

    मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की खून झाला, हे तपासणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्याने खळबळ उडाली आहे. सध्या खडसे विरुद्ध महाजन अशी आरोप-प्रत्यारोपाची फैरी सुरू झाली आहे. त्यात महाजन यांनी आज थेट खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने एकच चर्चा सुरू झालीय.

    महाजन म्हणाले की, ते माझ्या मुलाबाळांवर जात असतील, तर आमदार एकनाथ खडसेंना एक मुलगा होता. ३२ व्या वर्षी त्याला काय झाले? कुणामुळे झाले, हा ही संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना जास्त झोंबेल. तुमच्या मुलाचे काय झाले? आत्महत्या झाली की खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच तुमचे भले असल्याचे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले.

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची मंत्री महाजन उत्तरे देत होते. मंत्री महाजन म्हणाले, आमदार एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत, याचे त्यांना भान नाही. बेभान झालेले आहेत. वाट्टेल तसे बोलताहेत. अनेक ठिकाणच्या चौकशा, दूध संघ, भोसरीची भानगड अशा अनेक भानगडी आहेत. सबळ पुरावे मिळत असल्याने अस्वस्थ झाले आहेत.

    महाजन पुढे म्हणाले की, टांगेळ्याखालची भाषा बोलायला लागले आहेत. एका कार्यक्रमात ते गिरीश महाजनांना दुर्दैवाने मुलगा नाही, असे म्हणाले. तो आमदार झाला असता सूनही आमदार झाली असती. मला दोन मुली आहेत. त्यांना राजकारणात आणलेले नाही. मुलगा नसणे हे दुर्दैवी नाही. मुली असणे हे सुदैव आहे. आनंदी आहे. त्यांनाही एक प्रश्न आहे. त्यांनाही मुलगा होता. त्याचे काय झाले. त्याचे उत्तर द्यावे. हा विषय मला बोलायचा नाही.