मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं विधान

कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून एक मोठं विधान केलं आहे.

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात येत होते. सरकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी काही वेळ मागितला आहे. तर येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, असा अल्टिमेटम जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून एक मोठं विधान केलं आहे.

    मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    नेमकं काय म्हणाले महाजन?

    मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, हे मी त्यावेळीच स्टेजवरून सांगितलं होतं. ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेईल. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना सरकार कुणबीचा दाखला देत आहे. पण कुठल्या कायद्यानुसार देणार? कुठल्या नियमानुसार देणार? हा देखील मोठा प्रश्न आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.