औषध दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावणं आता बंधनकारक; प्रशासनाला सहकार्याची असोशिएशनची भूमिका

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्व औषध विक्रेते दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे. दिलेल्या कालावधीत औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

  नाशिक : औषध विक्रेत्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे असोशिएशनने स्वागत केले आहे. काही औषधे व्यसनासाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. औषध विक्रेते वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषध विकत नाही. त्यासंदर्भातील नाेंदीदेखील ठेवल्या जातात. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केल्याने या आदेशाचे देखील आम्ही स्वागत करताे. कुठल्याही प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांना जिल्हा केमिस्ट अण्ड ड्रगिस्ट असाेसिएशनचे सहकार्य असेल, असे असोशिएशनचे उपाध्यक्ष नीलेश पाटील यांनी सांगितले.

  प्रभावी अंमलबजावणी हाेणार

  देशभरात अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, होणाऱ्या अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी, जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले असल्याचे आदेश नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जारी केले आहेत. यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शेड्युल एक्स (शेड्यूल्ड एक्स, एच व एच १), एच व एच १ औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी. यासाठी संयुक्त कृती आराखड्यामध्ये नमूद केल्यानुसार फौजदारी प्रकि्रया १९७३ चे कलम १३३ अन्वये यासंदर्भात हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असे गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.

  पडताळणी करणार

  आदेशात पुढे म्हटले आहे की, शेड्युल एक्स, एच व एच १ औषधे व इन्हेलर विक्री करणारे औषधे विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात सीसी टीव्ही लावणे बंधनकारक आहे. तसेच दुकानांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावावेत. जिल्हा औषध नियंत्रण विभागाने नाशिक ग्रामीण विभागातील सर्व औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही याबाबत पडताळणी करावी. हे आदेश दि. २३ मार्च रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

  नियमाचं पालन बंधनकारक

  सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्व औषध विक्रेते दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे. दिलेल्या कालावधीत औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषध विक्रेते दुकानदार यांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.

  शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह्य आहे. कारण मानसिक विकारासाठी दिली जाणारे औषधे समाजात व्यसनासाठी वापरली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशी औषधं वैद्यकीय सल्याशिवाय कुणीही विकत नाही. त्यासंदर्भात नोंदी ठेवल्या जात असल्यातरी अशा औषधांची विक्री होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी यांनी क्लोज सर्किट कॅमेरे बंधनकारक केले आहेत. या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. असे नाशिक जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असो चे उपाध्यक्ष निलेश पाटील म्हणाले.

  सीसीटीव्ही कॅमेरे मेडिकलमध्ये बसवणे ही चांगलीच बाब आहे.याचे आम्ही स्वागतच करतो. पिंपळगाव बसवंतमध्ये ७० ते ८० % दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मेडिकलमधून एच व एच १ औषधे व इन्हेलर विक्रीसाठी वैद्यकीय शिफारस महत्वाची असते. त्याशिवाय ही औषधे विकली जात नाही. आज देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री होत आहे. त्यावर कसे निर्बंध घालणार? त्यावर निर्बंध घातले गेल्यास अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध आपोआप बसेल. नुसते मेडिकलमध्ये कॅमेरे बसवून फारसे यश साध्य होईल, असे वाटत नाही.