नद्यांच्या एकात्मिक व्यवस्थापनाने महापूर टाळणे शक्य ; कृष्णा खोरेचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे पीएच.डी.अंती मत

तीव्र पावसाच्या काळात धरणे आणि नद्यांमधील पाण्याचा विसर्ग कसा असावा याबाबत एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली राबवली तर महापूर टाळणे शक्य होईल असे मत या विषयावर पीएचडी केलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी अनौपचारिक गप्पांवेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  सांगली : तीव्र पावसाच्या काळात धरणे आणि नद्यांमधील पाण्याचा विसर्ग कसा असावा याबाबत एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली राबवली तर महापूर टाळणे शक्य होईल असे मत या विषयावर पीएचडी केलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी अनौपचारिक गप्पांवेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  धुमाळ यांनी महापुरावर उपाययोजना केलेल्या वडनेरे समिती बरोबर काम केले असून समितीच्या तीन शिफारशींवर काम सुरु आहे. महाराष्ट्र शासनामार्फत धुमाळ यांनी जपान येथे पूर व्यवस्थापन विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रतिनिधित्व केले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरा संदर्भात त्यांनी पीएचडी दरम्यान केलेला अभ्यास व काढलेले निष्कर्ष यासंदर्भात पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.

  आपल्या अभ्यासामध्ये महापूर येण्यापूर्वी 48 ते 72 तास त्याचा अंदाज देणारे मॉडेल तयार करण्यात आले आहे. अलमट्टी आणि हिप्परगीचा २००५ पासून आतापर्यंतच्या महापुराशी संबंध नाही. धरणातील पाणी सोडल्यामुळे महापूर येतो ही लोकभावना चुकीची असल्याचे आपल्या अभ्यासात स्पष्ट झाले असून जर ही धरणे नसती तर २०० ते २५० टीएमसी अधिकचे पाणी शहरात घुसून फार गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. यापुढे कोयना, वारणा, राधानगरी अशा २२ धरणाचं तसेच नदीतून येणारे पाणी सोडताना एकात्मिक परिचालन पद्धती कशी अवलंबावी याबाबतही एक सॉफ्टवेअर तयार केले असून ते वेळोवेळी धरणांमध्ये आणि नदीत किती पाणी आहे याचा प्रत्येक तासाचा विचार करून कोणत्या नदी आणि धरणातून किती विसर्ग करायचा ते ठरवून त्याची माहिती अलमट्टी आणि हिप्परगीलाही देईल. यातून किती पाणी सोडले जाईल याची माहिती, तिथून पुढे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी कर्नाटकचे सहकार्य घेता येऊ शकेल. हा प्रस्ताव शासन पातळीवर असल्याचेही धुमाळ यांनी सांगितले. आपण मांडलेले अभ्यासातील अनेक मतेही वडनेरे समितीच्या शिफारशीत असून शासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. एकात्मिक परिचालन सुरू झाले तर तो भारतातील पहिला प्रयोग असेल आम्ही त्या दृष्टीने सॉफ्टवेअर तयार केल्याची माहितीही धुमाळ यांनी दिली.

  मुक्त पाणी मोजण्यासाठी सहाय्य
  2019 सालच्या महापुरानंतर ११५०० चौरस किमी मुक्त संचार क्षेत्रात सुद्धा संततधार पाऊस झाल्याने तेथे पडलेला पाऊस मोजण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याबाबत जे अभ्यासक रुची दाखवतील त्यांना
  आपण सर्व ते सहकार्य करू असेही ते म्हणाले. याठिकाणी पडणारा पाऊस आणि जमणारे पाणी यांचे एक कोष्टक बनवावे लागेल.

  वळणं सरळ केल्यास पाणी पातळीत घट
  नदीतील वाढणे सरळ केल्यास त्याचा पाणी पातळी कमी होण्यासाठी फायदाच होईल असे सांगून आयर्विन ते कृष्णा बंधारा अर्धा मीटर, वारणा संगम येथे 0.75 मीटर, मिरज ते अर्जुनवाड येथे सव्वा मीटर इतकी पाणी पातळी कमी राहील. शिवाय दोन पुलांमध्ये 900 मीटर ते दीड हजार मीटर इतके अंतर असेल तर त्यामुळे पाणी अडण्याचा धोका निर्माण होणार नाही. मात्र त्यासाठी काही तांत्रिक काळजी घेणे आवश्यक असल्याचेही हेमंत धुमाळ यांनी सांगितले.