प्रविण माने यांचे ठरले! शरद पवार गटासोबत राहण्याचा घेतला निर्णय

आपल्या सोबत पुढारी कमी असले तरी मतदार राजा शरद पवार यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आपण घरोघरी जाऊन साहेब व ताईंच्या वतीने मते मागण्याचे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करायचे आहे. रणनीती आखायची आहे. पत्रके द्यायची आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये निश्चितच साहेब व ताईंच्या बाजूने मतदारांचा कल दिसणार आहे,असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम समिती चे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केला आहे.

  इंदापूर : आपल्या सोबत पुढारी कमी असले तरी मतदार राजा शरद पवार यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आपण घरोघरी जाऊन साहेब व ताईंच्या वतीने मते मागण्याचे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करायचे आहे. रणनीती आखायची आहे. पत्रके द्यायची आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये निश्चितच साहेब व ताईंच्या बाजूने मतदारांचा कल दिसणार आहे,असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केला आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) बैठक बुधवारी (दि.२५) इंदापूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात पार पडली.याप्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,जेष्ठ नेते कालिदास देवकर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,दादासो थोरात,मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,सुनीता भोसले, समद सय्यद, अक्षय कोकाटे, अरबाज शेख, सुधीर मखरे,श्रीकांत मखरे,अनिल ढावरे, विकास खिलारे, गफूर सय्यद, आझाद मुलाणी, बाळासाहेब चितळकर, देविदास भोंग, ॲड. मुलाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  पुढे बोलताना माने म्हणाले की,लोकसभेची निवडणूक पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे कोअर कमिट्या नेमून वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचले पाहिजे. शरद पवार आपल्या पाठीमागे आहेत त्यांचा आशीर्वाद आहे.

  आपल्याला कोणावर टीका टिपणी करायची नाही. तर सर्वांनी हातात हात देऊन काम करायचे आहे.सध्या संघटन बांधणीचे काम तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील व कार्याध्यक्ष महारुद्र पाटील उत्तम पद्धतीने करत आहेत. प्रत्येक गावांमधील तरुणांना फादर बॉडी मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.समाजामध्ये काम करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे व्यासपीठ सर्वांना उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सर्वांनी एकोपा करावा.ॲड.तेजसिंह पाटील व कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या कार्यकाळात होणारी निवडणुक इतिहासात नोंदवली जाईल.असेही त्यांनी नमूद केले.

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक लोकसभा झाल्यानंतरच होणार आहेत. सरकार या निवडणुका घेण्यासाठी घाबरलेले आहे. त्यामुळे त्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुक्यामध्ये पूर्ण ताकतीनिशी उतरणार आहे. पक्षाच्या बैठका यापुढे आठवड्याला, पंधरादिवसांना घेतल्या जाणार आहेत. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे इंदापूर तालुका त्यांच्या विचाराचा होईल.अशी खात्री असल्याचे यावेळी बोलताना कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी सांगितले.

  सदरच्या बैठकीत कार्यकर्त्यांची नोंदणी केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागळात पोहोचवण्याकरिता तसेच संघटनात्मक काम करण्याबाबत साधक-बाधक चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या ग्रुप समित्या स्थापन करून महिलांना, तरुणांना तसेच समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देऊन पक्ष बळकट करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचे या बैठकीत ठरले आहे. यावेळी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे याकरिता ठराव केला असून तो राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील यांनी सांगितले.

  पवार साहेबांचे विचार आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विकास कामांचा प्रचार आणि प्रसार ही खूप मोठी शिदोरी आपल्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडे असल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंना भरघोस मताधिक्य देण्यासाठी गावागावात व घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला जोडण्याचे काम करणे हेच आद्य कर्तव्य असल्याचे दादासाहेब थोरात यांनी सांगितले.