माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हते; पंकजा मुंडेंनी केला दावा

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार सभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यात पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांचा ताफा दोन वेळा अडवण्यात आला.

    मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवत मोठं मोठ्याने घोषणा देत सगळीकडे घोषणाबाजी केली. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हते तर माझी गाडी अडवण्याचा प्रायोजित कार्यक्रम होता, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्या प्रसार माध्यमांशी संवाद साधत होत्या.

    पंकजा मुंडे म्हणाल्या, मागच्या वेळी माझा ताफा अडवून अशीच घोषणाबाजी करण्यात आली होती. हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. हे सर्व मराठा आंदोलक असून शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे कालचा प्रकार हा प्रायोजित कार्यक्रम होता. कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी होत नाही. मी कोणत्याही समाजाचा द्वेष देखील केलेला नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण नक्कीच मिळेल, असा शब्द मी मराठा बांधवाना दिला आहे. मात्र हा सर्व प्रकार वारंवार घडत असल्याने मी भावुक झाली, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    बीडमध्ये ४० उमेदवार फिरतात. मग हा अनुभव माझ्याच वाट्याला का? असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्याचे सोशल फॅब्रिक जीर्ण करण्याचं मोठं षडयंत्र कोण रचतं हे माहीत नाही. याआधी बीडमध्ये असे काही झाले नव्हते. बीडमध्ये दररोज ४० उमेदवार फिरतात. मग आरक्षणाच्या मागणीवरून हे अनुभव माझ्याच वाट्याला का येतात? मी कोणत्याच घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुद्दामून येऊन ताफा अडवला जातो. ताफा अडवणारी सर्व मुले १४ ते १५ या वयोगटातील आहेत. हे सर्व पाहून मी भावुक झाली. बीडमध्ये सध्या जे काही प्रकार चालू आहेत त्याचा मतांवर जास्त परिणाम होणार नाही. राजकारणी म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.