“एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे…”, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन शिंदे-ठाकरे गटात कलगीतुरा; मंत्री दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो अन् तो दावोसलाच होतो. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

    मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील आठवड्यात दावोस (Davos) दौरा केला होता. आता या दौऱ्यावरुन विरोधक खासकरुन ठाकरे गट व सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने गेले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच यातील गुंतवणूकीची आकडेवारी याच सरकारने केलेली घोषणा चुकीची असल्याचं आदित्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून आता शिंदे गट (Shinde Group) आक्रमक झाला आहे.

    दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. युवकांना मॅच्युरीटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे, असं दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टिका केली. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले, तेव्हा त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का?, असा सवाल केसरकर यांनी केला.

    मुंबईत असताना परदेशी शिष्टमंडळाला भेट नाकारणारे मुख्यमंत्रीही होऊ गेलेत. तसेच 76 तासांमधील 72 तास काम करणारे मुख्यमंत्रीही होऊन गेले. त्यांच्यावर टीका का करता? पंतप्रधान मोदी ही इंटरनॅशनल फिगर आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो अन् तो दावोसलाच होतो. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना एवढा कॉमनसेन्स नसेल तर अवघड आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.