दुरावलेल्या सहकाऱ्यांना सक्रिय करण्याची पवारांची व्यूहरचना; जाचक पिता-पुत्रांनी घेतली शरद पवार यांची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला गट स्ट्रॉंग करण्यासाठी व्यूवरचना सुरू केली असून, गेल्या काही वर्षांपासून आपल्यापासून दुरावलेल्या नेत्यांना आपल्या गटाकडे सक्रिय करण्याची रणनीती सध्या त्यांनी सुरू केली आहे.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला गट स्ट्रॉंग करण्यासाठी व्यूहरचना सुरू केली असून, गेल्या काही वर्षांपासून आपल्यापासून दुरावलेल्या नेत्यांना आपल्या गटाकडे सक्रिय करण्याची रणनीती सध्या त्यांनी सुरू केली आहे. पवार यांच्या या रणनीतीचा भाग म्हणून राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व त्यांचे पुत्र कुणाल जाचक यांनी गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  सध्या पवार कुटुंबात पक्ष फुटीनंतर राजकीय द्वंद्व जोरात सुरू झाले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती देणारा रथ बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरू लागला आहे.

  दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी अलर्ट भूमिका घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामतीसह अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क अधिक वाढवला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीमध्ये बूथ कमिटी कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी आपणास एकटे पाडले जात असल्याचे भावना विवश होऊन सांगत शरद पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता वरिष्ठ असा उल्लेख करून नेहमीप्रमाणे त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

  सुप्रिया सुळे यांनी देखील विविध कार्यक्रमांमध्ये आक्रमक भूमिका घेत भाजपवर शरसंधान साधले. उमेदवार कोणीही असला, तरी निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले.

  दरम्यान, छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी काम केलेले पृथ्वीराज जाचक हे शरद पवार यांच्यापासून गेल्या काही वर्षांपूर्वी दुरावले आहेत. छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज जाचक यांना डावलून दत्तात्रय भरणे यांना अध्यक्ष केल्याने जाचक यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली होती. शरद पवार यांचे पट्ट शिष्य असलेले जाचक यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देऊन २००४ मध्ये झालेल्या बारामती लोकसभेची निवडणूक त्यांच्या विरोधात भाजपमधून लढवली होती.

  या निवडणुकीत जाचक यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. तेव्हापासून जाचक यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या विरोधात छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विरोधात काम सुरू केले. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या विरोधात आपले स्वतंत्र पॅनल उभा करून निकराची झुंज त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी गटापुढे जाचक यांचा निभाव लागला नाही.

  छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केलेले पृथ्वीराज जाचक यांना छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून छत्रपती कारखान्याच्या सत्ताधारी गटाला विविध आंदोलनाच्या माध्यमातून शह देण्याचा जाचक यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. गेली तीन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाचक यांच्याशी दिलजमाई करून त्यांना छत्रपती कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्याची विनंती केली.

  अजित पवार व पृथ्वीराज जाचक यांचे राजकीय वैर या निमित्ताने काही दिवस मिटले होते. मात्र, त्यानंतर सत्ताधारी गटातील मतभेदामुळे जाचक यांनी पुन्हा विरोधी भूमिका घेतली. आगामी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या विरोधात जाचक यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाचक व त्यांचे पुत्र कुणाल जाचक यांनी बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

  जाचक पिता-पुत्रांची भेट बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये मोठी चर्चेत आली आहे. शरद पवार यांची आपण घेतलेली भेट ही अनौपचारिक असल्याचा खुलासा पृथ्वीराज जाचक यांनी दिला असला तरी या भेटी मागे आगामी राजकीय गणिते दडलेली आहेत.