kdmc protest news

टिटवाळा येथील आरक्षित भूखंडावर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाची जागा ताब्यात घेणे, बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे सामान्य नागरिकांना मालमत्ता करात सूट द्यावी, आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करणे, विविध प्रकल्पात बाधित नागरिकांचे पुनर्वसन करणे यासारख्या काही मागण्यांसाठी श्रीनिवास घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली आपचे धनंजय जोगदंड, राजेश शेलार माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, अनिल कर्पे, गिता जोशी आणि सहकारी यांनी जागरूक नागरिक संघटनेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून आंदोलन छेडले आहे.

    कल्याण : जागरूक नागरिक संघाच्या (Jagruk Nagrik Sangha) वतीने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मागण्यांसाठी मागील अनेक दिवसापासून आंदोलन (Protest) सुरु असताना या आंदोलनकर्त्यांची प्रशासनाकडून बोळवण केली जात आहे. यामुळेच संघटनेच्या वतीने थेट कल्याण डोंंबिवली पालिकेच्या (KDMC) आयुक्त दालनाबाहेर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र सोमवारी या आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारा बाहेरच अडविण्यात आले तर मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मुख्यालयाच्या आवारात धडक दिली मात्र इमारतीच्या प्रवेशद्वारावर त्यांना रोखण्यात आल्याने प्रवेशद्वारा समोरच त्यांनी ठाण मांडले. संघटनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर धडक देत दालनात जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखत मुख्यालयाच्या इमारतीबाहेर आणले. यामुळे संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा (Crime) नोंदविण्यासाठी धाव घेतली.

    सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या टिटवाळा येथील आरक्षित भूखंडावर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाची जागा ताब्यात घेणे, बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे सामान्य नागरिकांना मालमत्ता करात सूट द्यावी, आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करणे, विविध प्रकल्पात बाधित नागरिकांचे पुनर्वसन करणे यासारख्या काही मागण्यांसाठी श्रीनिवास घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली आपचे धनंजय जोगदंड, राजेश शेलार माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, अनिल कर्पे, गिता जोशी आणि सहकारी यांनी जागरूक नागरिक संघटनेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून आंदोलन छेडले आहे. मात्र या आंदोलन कर्त्याची आश्वासनावर बोळवण करण्यात येत आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून यातील एकाही प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नसल्याने सोमवारपासून संघटनेने आयुक्त दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळेच सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रयत्न केला. तर आज या आंदोलनकर्त्यांना पालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या आवारात रोखण्यात आले.  संघटनेच्या वतीने काही महिला कार्यकर्ते आयुक्ताच्या दालनाबाहेर पोचले. दालनात आयुक्त नसल्याचे कळताच त्यांनी आरडाओरड केल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले. मात्र नागरिकाना भेटण्याच्या वेळात आपल्याला आयुक्तांना का भेटू दिले जात नाही असा सवाल करत विरोध करणाऱ्या सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यासाठी जागरूक नागरिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.