जगतापांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! स्वकीयांवर निशाणा; आ. गोपीचंद पडळकरांविरुद्ध थोपटले दंड 

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी जतमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा व तो कार्यकर्त्यांना सांगावा. आमदारकीसाठी मी ही इच्छुक आहे, पण विलासराव जगताप असेपर्यत आपण विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे भाजपचे पवार यांनी आवर्जून सांगितले.

  जत :आपल्या ४० वर्षाच्या राजकारणात प्रस्थापितांविरुद्ध लढा देताना जतकरांनी मला भरभरून साथ दिली. राजकारणात राष्ट्रवादी असो की भाजप ज्या ठिकाणी काम केले तेथे प्रामाणिक काम केले, परंतु अलीकडील काळात राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. वय झाल्याचे सांगून डावलले जात आहे. राजकारणात काम करायचे असेल तर बुद्धी, संघटन व चातृर्य महत्वाचे असल्याचे सांगत जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपल्याकडे हे सर्व गुण आहेत. येणाऱ्या काळात जतकर जर माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असतील, माझ्यावर त्यांचा विश्वास असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जतचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख योगेश जानकर, जत विधानभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विलासराव जगताप यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट भाजपलाच घरचा आहेर देत आव्हान दिले आहे.

  जत येथे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात जगताप यांनी आपल्या खास आक्रमक शैलीत आपली भूमिका मांडत कार्यकर्त्यांची मने जिंकली. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, हरिभाऊ बागडे, आकाराम मासाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, चंद्रकांत गुडोडगी, पंचायत समितीचे माजी सदस्य रामण्णा जिवण्णावर, रविंद्र सावंत, लक्ष्मण बोराडे, शिवाप्पा तावशी, रमेश जगताप, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक गौतम ऐवाळे, विठ्ठल निकम, राजू चौगुले, तेजस्विनी व्हनमाने, समाधान जगताप, विजयकुमार नामद, रमेश पाटील, अजिंक्य सावंत, आनंदा पाटील, आर.बी. पाटील, सिताराम गायकवाड, राजू डफळे, अविनाश गडीकर, अविनाश सावंत, पपु भंडे, नवनाथ बंडगर,  प्रमोद सावंत, ज्ञानेश्वर आटपाडकर, पापा कुंभार, आण्णा चव्हाण यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

  भाजप वगळता आजपर्यत ज्या पक्षात काम केले तेथे आपणास विश्वास घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठीने काम केले नाही, हा इतिहास आहे, पण भाजपने उलटे केले आहे. जतच्या विधानसभा निवडणूक प्रमुखपदी तम्मणगौडा यांची निवड करताना आपणास विश्वासात घेतले नसल्याची खंत व्यक्त करीत जगताप यांनी भाजपचे आमदार  गोपीचंद पडळकर व योगेश जानकर यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडून भरीव निधी देतो, म्हणून जतच्या सरपंचांना वेड्यात काढले व निघून गेले. आटपाडीला निधी न देता आमदार पडळकर जतला भरीव निधी देत आहेत. जतच्या राजकारणात आमदार पडळकर तम्मणगौडा रवी पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. आमदार पडळकर यांची सार्वजनिक भाषा वेगळी आहे, तर खासगीतील भाषा उर्मटपणाची आहे. जतची जनता आमदार पडळकर यांना स्विकारणार नसल्याचे सांगत जगताप यांनी आमदार पडळकर जत विधानसभेच्या आखाड्यात उतरले तर त्यांच्याविरुद्ध दंड थोपटू, असा इशारा जगताप यांनी यावेळी दिला.

  जनमताचा आपण आदर करून निर्णय घेवू पण चुकीचा निर्णय झाल्यास तो निर्णय खपवून घेणार अाहे. मला सत्ता नको आहे तर मला जतचा विकास हवा आहे. जनतेची इच्छा असेल तरच आपण निवडणुकीत उतरू अन्यथा जनता ज्यांना पसंती देईल त्यांच्या पाठीशी आपण आहोत. यासंदर्भात लवकरच जत तालुक्याचा गट व गणनिहाय दौरा करणार अाहे.

  विलासराव जगताप, माजी अामदार

  शेवटपर्यंत जगताप यांच्यासोबत- प्रकाश जमदाडे
  सन २०१९ वगळता २००१ पासून विलासराव जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण प्रामाणिकपणे काम केले. आमदारकीसाठी आपण इच्छुक असलो तरी जगताप यांचा शब्द अखेरचा असेल. शेवटपर्यत आपण विलासराव जगताप यांच्या सोबत राहू व ते जे ठरवतील त्यांच्या शब्द प्रमाण राहून काम करू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी यावेळी बोलताना दिली.

  जतमध्ये जगतापांशिवाय पर्याय नाही : डॉ. आरळी
  जतमध्ये भाजपचे कमळ पुन्हा फुलवायचे असेल तर विलासराव जगताप यांची मदत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रविंद्र आरळी यांनी भाजप कार्यकर्त्यानी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोणीही असो भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

  जगताप हाच आमचा पक्ष : सुनील पवार
  भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी जतमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा व तो कार्यकर्त्यांना सांगावा. आमदारकीसाठी मी ही इच्छुक आहे, पण विलासराव जगताप असेपर्यत आपण विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे भाजपचे पवार यांनी आवर्जून सांगितले.