Lalit Patil escape
Drug Mafia Lalit Patil Case

  पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात कारागृहातून ससून रुग्णालयात “रेफर” करणाऱ्या तसेच आरोपींच्या संपर्कात असलेल्या येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. कारागृह विभागातील ही तिसरी अटक असून, यामध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.

  ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  डॉ. संजय काशिनाथ मरसाळे (वय ५३) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
  ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या ससून रुग्णालयातील पलायनप्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १३ जणांना अटक केली आहे. डॉ. संजय मर्साळे याची १४ वी अटक आहे.

  कारागृहाच्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक

  पलायनप्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, ललित पाटील याला पळून जाताना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी कॉन्सलर आणि कारागृहाच्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली होती. त्यानंतर आता पुढील तपासात डॉ. संजय यांचा सहभाग समोर आला आहे. त्यानुसार त्यांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.

  ससून रुग्णालयात रेफर करताना मुद्दाम

  डॉ. संजय हे येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) म्हणून काम करतात. कारागृहातून एखाद्या कैद्याला खासगी व ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवायचे असल्यास डॉ. संजय यांच्याकडून परवानगी देण्यात येते. रुग्णाच्या आजारावर ते त्याला पाठवितात. परंतु, ललित याला त्यांनी ससून रुग्णालयात रेफर करताना मुद्दाम पाठविल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉ. संजय हे ललित, ललितचा भाऊ भूषण आणि अभिषेक यांच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

  ललित पाटीलप्रकरणात आतापर्यंत २८ जणांना अटक
  ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन तसेच ड्रग्ज विक्रीप्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गुन्ह्यात तब्बल २८ आरोपींना अटक केली आहे. पलायनप्रकरणात १४ जणांना अटक केली आहे. तर, ड्रग्जप्रकरणात १४ जणांना अटक झाली असून, या १४ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.