उरुळी कांचन येथील जयश्री गदादे यांच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद ; श्री गणेशाचे विविध प्रकारची रेखाचित्रे रेखाटण्याचा विक्रम

श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम जयश्री सुभाष गदादे (वय ५८, परिवर्तन सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे.

  उरुळी कांचन: श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम जयश्री सुभाष गदादे (वय ५८, परिवर्तन सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जयश्री गदादे यांच्यावर उरुळी कांचनसह जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  यापूर्वी तेलंगणा येथील अत्यम रामदेव या महिलेच्या नावावर श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वाधिक पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम होता. अत्यम रामदेव यांचा ३७ रेखचित्रांचा विक्रम मोडून जयश्री गदादे यांनी १४२ रेखाचित्रे रेखाटली आहेत.  यामध्ये सर्व अष्टविनायक गणपती, गणेशाची विविध नावे व अनेक रूपांमध्ये गणेशाच्या चित्रांचा समावेश आहे. त्यांच्या या चित्रांची २०२३ च्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.
  जयश्री गदादे या उरुळी कांचन येथील गृहीणी असून,त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे.  जयश्री गदादे यांनी कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. जयश्री गदादे यांना चित्र रेखाटण्याची खूप आवड आहे.त्यांनी लग्नानंतरही ती आवड जोपासत हे यश संपादन केले आहे. यापूर्वी त्यांनी उरुळी कांचन येथील रांगोळी स्पर्धेत सलग ५ वर्ष प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच त्यांनी श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वाधिक पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
  दरम्यान,जगन्नाथ लडकत यांनी पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरामध्ये जयश्री गदादे यांचा पेशवाई शेला, पुष्पगुच्छ, श्रीफळ व संत ज्ञानेश्वर महाराज जीवनावरील भा.द.खेर लिखित ‘संजीवन’ कादंबरी देऊन सन्मान केला. यावेळी सतिश मोहोळ, संकेत गदादे, राजेंद्र ताठे, छाया गदादे, गीता व नितीन गिरमे व रामचंद्र मणेरीकर, अर्जुन डासालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी तयारी करणार
  या रेकॉर्ड बाबत बोलताना जयश्री गदादे म्हणाल्या की, ‘माझ्या चित्रांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता माझी  जबाबदारी वाढली आहे. भारतातील सर्व राज्यांच्या नावाने गणपतीचे चित्र रेखाटणार आहे. तसेच आगामी काळात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये भाग घेण्यासाठी तयारी करणार आहे’.