जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत खडसेंचा धुव्वा

सुमारे ५०० कोटींची उलाढाल असणार्‍या दूध संघाची मागील निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. तिची पंचवार्षिक मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपली होती. कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंतर यंदा ही निवडणूक झाली. भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागा ताब्यात घेऊन खडसे यांच्या सहकार पॅनलचा धुव्वा उडविला आहे.

    जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलच्या (Shetkari Vikas Pannel) ताब्यात संघ गेला आहे. शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना या विजयाचा फायदा होणार आहे.

    सुमारे ५०० कोटींची उलाढाल असणार्‍या दूध संघाची मागील निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. तिची पंचवार्षिक मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपली होती. कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंतर यंदा ही निवडणूक झाली. भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागा ताब्यात घेऊन खडसे यांच्या सहकार पॅनलचा धुव्वा उडविला आहे.

    २०१५ मध्ये आमदार खडसे हे भाजपमध्ये होते, त्यावेळी त्यांनी सर्वपक्षीय पॅनलचा प्रस्ताव सादर करीत दूध संघात वर्चस्व मिळवीत, कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या रूपाने जिल्हा बँकही ताब्यात घेतली होती. मात्र, नंतर खडसेंनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तांतरनाट्य घडल्याने जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे या राजकीय शत्रुत्वास अधिकच धार चढली.

    राज्यात सत्तांतर नाट्यानंतर दूध संघात शासनाच्या आदेशाने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. शासनाने प्रशासकप्रमुख म्हणून भाजपचे चाळीसगावचे आमदार चव्हाण यांची नियुक्ती केली. त्यांनी प्रशासकपदाच्या ३२ दिवसांत दूध संघातील सात वर्षांतील मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळातील नोकरभरतीसह गैरकारभार उघडकीस आणला. तसेच, खडसेंचे निकटवर्तीय कार्यकारी संचालकांसह चार अधिकार्‍यांना अटकही झाली.

    आजपर्यंत सहकार क्षेत्रात प्रवेश न केलेले मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघात जळगाव मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवीत प्रवेश केला. दूध संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांसह मंदाकिनी खडसे यांना निवडून आणणे, हेच खडसेंसमोर मोठे आव्हान होते. खडसेंच्या विरोधात दोन मंत्री, पाच आमदार आणि दोन खासदार असे दिग्गज होते. शिवाय, त्यांच्या पाठीशी सत्ताही होती. आमदार चव्हाणांपेक्षा मंदाकिनी खडसेंना ७६ मते कमी मिळाली. भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्यांतली म्हणजे खडसेंच्या बालेकिल्ल्यातील १६ मते चव्हाणांना मिळाली आहेत.