जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व; खडसेंच्या पॅनलला मोठा धक्का

एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे.

  • एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचाही पराभव

जळगाव : संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत (Jalgaon Dudh Sangh Election). या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ  खडसेंना (NCP Leader Ekanath Khadse) मोठा धक्का बसला आहे. जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं (BJP Shinde Camp) विजय मिळवला असून, खडसेंच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे.

एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे.

सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. आता, या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत.

यात खडसे परिवाराला मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झाला आहे. शेवटी दूध संघातील सत्ताही त्यांच्या ताब्यातून निसटली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली : खडसेंचा आरोप

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

दूध संघ निवडणूक निकाल

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांचे स्विय सहायक अरविंद देशमुख विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा बँकेचे माजी संचालक विजय पाटील पराभूत झाले.

एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलमध्ये ओबीसी मतदारसंघातून माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे विजयी, मोरे यांच्या विरोधात गोपाळ भंगाळे उमेदवार होते.

– भाजपा आमदार संजय सावकारे एससी मतदार संघातून विजयी, प्रतिस्पर्धी श्रावण ब्रम्हे पराभूत.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर महिला राखीव मतदार संघातून विजयी, महिला राखीव मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनल सोबतच गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलला एक जागा मिळाली आहे, त्यात पूनम पाटील विजयी झाल्या आहेत.

पारोळा तालुका मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील पराभूत.

धरणगाव तालुका मतदासंघात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलचे संजय पवार विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी वाल्मीक पाटील पराभूत.

अमळनेर तालुका मतदासंघात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील विजयी, त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ पराभूत झाल्या आहेत.