एकीकडे जल्लाेष तर दुसरीकडे निषेध; राष्ट्रवादीच्या दाेन्ही गटांकडून साेयीच्या प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने पक्षाच्या कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 7) आंदाेलन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयाेगाचा निषेध करण्यात आला. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने आंनंदाेत्सव साजरा केला गेला आहे.

    पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने पक्षाच्या कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 7) आंदाेलन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयाेगाचा निषेध करण्यात आला. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने आंनंदाेत्सव साजरा केला गेला आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

    मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभर अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या वतीने पुण्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांची बैठक आयाेजित केली गेली हाेती. डेंगळे पुलाजवळील पक्षाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला अपेक्षेनुसार शहरातील दाेन आमदार, काही माजी नगरसेवक हे उपस्थित राहिले नाहीत. एक ते दोन नगरसेवक सोडले तर सर्वच नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

    परंतु, मोठ्या संख्येने कार्यकर्ते मात्र, उपस्थित होते. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आक्रमक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाची कोनशिला काढली.

    ‘जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल’

    यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘आज पक्षाचे कार्यकर्ते हे आमच्या बरोबर आहेत. लवकरच पक्ष आणि पक्षाचे नाव हे जाहीर होणार आहे. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह हे आमचे नेते शरद पवार आहे. जरी आज त्यांनी फटाके फोडले असले तरी हे त्यांचे शेवटचे फटाके होते. आता यापुढे निवडणुकीत आम्ही फटाके फोडणार आहोत आणि राज्यातील जनता ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.‘’