शिवनेरीहून बुधवारी निघणार जनआक्रोश मोर्चा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

केंद्र आणि राज्य सरकारविरोधात पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर रोजी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, या आक्रोश मोर्चाला बुधवारी(दि. २७) शिवनेरी (जुन्नर) येथे प्रारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

    जुन्नर : केंद्र आणि राज्य सरकारविरोधात पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर रोजी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, या आक्रोश मोर्चाला बुधवारी(दि. २७) शिवनेरी (जुन्नर) येथे प्रारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
    शेतकरी आक्रोश मोर्चा’चा प्रारंभ बुधवारी झाल्यानंतर ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण (मशाल मोर्चा), केंदूरला पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी (दि. २८ रोजी) केंदूर येथून शिक्रापूर, न्हावरा, मांडवगण, निर्वि मार्गे दौंड येथे मुक्कामी जाईल. २९ डिसेंबरला दौंड येथून इंदापूर मार्गे बारामती येथे जाणार असून बारामती शहरात मशाल मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल. तर, ३० डिसेंबर रोजी बारामती येथून उरळीकांचन, कुंजीरवाडी, हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपारी ३.०० वाजता सांगता सभा होणार आहे.
    या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
    रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार
    कांद्यावरील निर्यात बंदी, दूधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे संसदेत या विषयांवर चर्चा व्हावी, अशी  मागणी संसदेचे अधिवेशनातं शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असता  सत्ताधाऱ्यांनी या दोन खासदारांसह जवळपास १४६ खासदारांचं निलंबन विविध कारणांवरून केलं. त्यानंतर रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार आम्ही केला असुन,  महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून आम्ही ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे रणशिंग फुंकले असल्याची माहिती खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली.