विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसील कार्यालयावर जनता दलाचा मोर्चा

राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा २५०० रूपये पेन्शन सुरू करण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत २००० रुपयांची वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आटपाडी एसटी स्टॅण्ड ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

    आटपाडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा २५०० रूपये पेन्शन सुरू करण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत २००० रुपयांची वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आटपाडी एसटी स्टॅण्ड ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

    या मोर्चात सांगोला, खानापूर, माळशिरस, तासगाव व आटपाडी तालुक्यातील ६० वर्षीय वयोवृद्ध व शेतकरी मोठ्या संख्येने सामिल झाले होते. जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आबा सागर म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. १६ रूपये ६६ पैशांमध्ये शेतकऱ्याला साधा एक कप चहा येत नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आहे. शेतकरी व वयोवृद्ध यांना पेन्शन मिळवून देणार असे जाहीरनामे निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी दिले. परंतु, नंतर त्याचे काय झाले? असा सवाल आबा सागर यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दरमहा केंद्राने २५०० रूपये पेन्शन सुरू करावी व राज्यानेही त्यांचा आदर्श घ्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार बाई माने यांना देण्यात आले.

    यावेळी प्रा. लक्ष्मण शिंदे म्हणाले, सरकार कारागृहात चोर, दरोडेखोरांवर महिन्याला ६ हजार रूपये खर्च करते. शेतकऱ्यांना दरमहा २५०० द्यायला काय हरकत आहे? असा सवाल प्रा. शिंदे यांनी उपस्थित केला. वेगवेगळ्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

    शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष भाई अमित गिड्डे, पतंगराव गायकवाड,  तुकाराम खिल्लारी, सुरेश पाटील रामचंद्र कोळेकर, प्रा. लक्ष्मण शिंदे, काॅ. सिध्दार्थ केंगार, बजरंग पाटील, माणिक पांढरे, बजरंग गटगुळे आदी मान्यवर वयोवृद्ध, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.