लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्यावर जानकर ठाम; महायुतीच्या बैठकीत कोणताही निर्णय नाही

    अमोल तोरणे/बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह इतर घटक पक्ष्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीदेखील उपस्थिती दर्शविली, त्यामुळे जानकर महायुती सोबत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    युती बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही

    मात्र, निमंत्रण आल्याने आपण त्या बैठकीस उपस्थित राहिलो, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचा पुनरुच्चार महादेव जानकर यांनी दैनिक ‘नवराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला.
    राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये जनस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. आत्तापर्यंत १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये ही जनस्वराज्य यात्रा पोहोचली आहे.

    भाजपवर अप्रत्यक्ष टीका

    महायुतीतील महत्वाचा पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जनस्वराज्य यात्रेदरम्यान भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानकर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस आघाडी सोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

    “एकला चलो रे!” चा नारा

    दोन दिवसांपूर्वी जनस्वराज्य यात्रेचे आगमन बारामती लोकसभा मतदारसंघात झाल्यानंतर जानकर यांनी “एकला चलो रे!” चा नारा दिला होता. यावेळी त्यांनी काँग्रेसने छोट्या पक्षांना संपवण्याची जी रणनीती केली, तीच रणनीती भाजप देखील करत आहे, “मोठा मासा छोट्या माशाला खातो”, हे उदाहरण देत त्यांनी भाजपवर देखील टीका केली होती.

    नुकतीच मुंबईत महायुतीची बैठक पार पडली

    नुकतीच मुंबईत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रहारचे बच्चू कडू, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, रिपाईचे नेते जोगेंद्र कवाडे आदींसह इतर आमदार खासदार उपस्थित होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीची बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बनवलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईमध्ये होत असताना, महायुतीने आपल्या घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. यामध्ये जानकर उपस्थित राहिल्याने, ते महायुतीमध्ये सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती.

     

    निमंत्रण आल्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून मी उपस्थित राहिलो. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आपण दौरा केल्यानंतर, त्या भागातील जनतेने उत्स्फूर्त स्वागत केले, सर्वच ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातदेखील आमचा उमेदवार असणार आहे.