पन्हाळ्यात जनसुराज्यचे वर्चस्व कायम! शिवसेना नरके गटाला एक, पी. एन. पाटील गटाला दोन तर स्थानिक आघाडीला पाच ठिकाणी सत्ता

पन्हाळा तालुक्यातल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी माळवाडी ग्रामपंचायत या अगोदरच बिनविरोध झाली होती. १४ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. पन्हाळा तालूक्यात १४ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाला तर शिवसेना नरके गटाला एक, पी. एन. पाटील गटाला दोन तर स्थानिक आघाडीला पाच ठिकाणी सत्ता स्थापन करता आली.

  पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी माळवाडी ग्रामपंचायत या अगोदरच बिनविरोध झाली होती. १४ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. पन्हाळा तालूक्यात १४ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाला तर शिवसेना नरके गटाला एक, पी. एन. पाटील गटाला दोन तर स्थानिक आघाडीला पाच ठिकाणी सत्ता स्थापन करता आली. खोतवाडी येथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला.
  पन्हाळा तालुक्यातल्या १५ ग्रामपंचायतींपैकी माजगाव पैकी माळवाडी  ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने पन्हाळ्याच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १४ ग्रामपंचायतींसाठी आठ टेबलवर २ फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्यात आठ ग्रामपंचायतीचा निकाल तर दुसऱ्या टप्यात सहा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यासाठी पंन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणीच्या ठिकाणी पन्हाळा पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीच्या ठिकाणी प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी, नायब तहसिलदार अस्लम जमादार, संजय वळवी उपस्थित होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष केला. गावोगावी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
  आठ ठिकाणी सत्तांतर
  १४ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा फडकला तर इतर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना नरके गट, पी. एन. पाटील गट, स्थानिक पाच आघाड्या तर खोतवाडी येथे अपक्ष उमेदवाराने यश मिळविले. पन्हाळा तालुक्यात आठ ठिकाणी सत्तांतर झाले.
  खाेतवाडीत अपक्ष सरपंच
  खोतवाडी येथे ग्रामपंचायतीत सात सदस्य बिनविरोध झाले होते, तर सरपंचपदासाठी निवडणूक लागली होती. यामध्ये आनंदी बापूसो रणदिवे या अपक्ष उमेदवाराने ७७ मतांनी विजयी िमळविला. दरम्यान सुळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार एकनाथ बाळू पाटील व दिपक राजाराम पाटील यांना समान मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे निकाल देण्यात आला. यामध्ये दिपक पाटील विजयी झाले.