
“जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत,” असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले. “जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत,” असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
“मराठा समाजाला १० टक्के ईडब्ल्यूस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत,” असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे.. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
…त्यामुळे मराठा तरुणांचे नुकसान
तसेच “सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. सर्व काही जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे ठरवू नये. अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं आवाहन असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.