
सध्या धरणाचा पाणी साठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे.
- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन
- ९ हजार ४३२ क्यूसेक्सने विसर्ग सुरु
- धरणाचा पाणी साठा ९० टक्क्याच्यावर
औरंगाबाद : पैठण (Paithan) जायकवाडी धरणाचा (Jayakwadi Dam) (नाथ सागर जलाशय) पाणीसाठा ९० टक्क्याच्यावर पोहचत असल्याने आज सायंकाळी साडे सहा वाजता धरणाचे १८ दरवाजे (18 Gates Open) अर्धा फुटाने उचलत नऊ हजार ४३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग (Discharge Of Water In Cusecs) सुरू करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांच्याहस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले, त्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वक्र दरवाजाचे बटन दाबून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे.
यावेळी अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तायत्रे निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची उपस्थिती होती. सध्या जायकवाडी धरणात ३६ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी दाखल होत आहे.
सध्या धरणाचा पाणी साठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले.