‘आमदार फोडण्यासोबतच पक्षही पळवून नेला जात असेल तर…’; जयंत पाटील यांची टीका

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने लागला आहे. त्यावरून शरद पवार गटाकडून अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला जात आहे. त्यात आता जयंत पाटील यांनी म्हटले की, 'महाराष्ट्रातले आणि देशातील पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने आहेत.

    मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने लागला आहे. त्यावरून शरद पवार गटाकडून अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला जात आहे. त्यात आता जयंत पाटील यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातले आणि देशातील पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने आहेत. हे आम्ही आयोगापुढे सिद्ध केले होते. निवडणूक आयोगाच्या देहबोलीवरून आम्ही सिद्ध करत असलेल्या गोष्टी त्यांना पटत होत्या. पण आता निर्णय आला आहे. आमदार फोडण्याबरोबर पक्षही पळवून नेला जात असेल तर ही लोकशाहीला धक्का बसेल’, असेही त्यांनी सांगितले.

    केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो, अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यात जयंत पाटील म्हणाले, ‘शरद पवार यांनी देशातील २८ राज्यात पक्ष विस्तार केला. त्यापैकी २३ राज्यांच्या अध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. महाराष्ट्र विधी मंडळाचे सदस्य अजित पवार यांच्याकडे जास्त आहेत म्हणून निवडणूक आयोगाने तसं निर्णय दिला. काडार शरद पवार आहे हे दाखवून देखील असा पक्ष आणि चिन्हाबबत निर्णय झालेला आहे’.

    तसेच सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत आपण जाणार आयोगाचा निकाल अनपेक्षित होता. कारण आमच्या वकिलांच्या मुद्द्यावर समोरच्याच्या वकिलांकडून प्रतिवाद झाला नव्हता. आयोगाने असा निर्णय देऊन आमच्यावर आणि शरद पवार यांच्यावर अन्याय केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. सुप्रीम कोर्ट लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्याबाबत न्याय करेल. आता यापुढे काय करायचे हे ठरवले नाही. यावर आता निर्णय होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.