कोरेगावच्या लोकप्रतिनिधींचा गुंडाराज सरकारला पाठिंबा; जयंत पाटलांची आमदार महेश शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

राज्यात आता पोलीस स्टेशनमध्ये आमदार बंदुकीतून गोळ्या झाडत आहेत. गोळ्या झाडणारा आमदार मुख्यमंत्रीच गुंड निर्माण करत असल्याचे सांगतो, अशा गुंडाराज सरकारला येथील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे.

    कोरेगाव : राज्यात आता पोलीस स्टेशनमध्ये आमदार बंदुकीतून गोळ्या झाडत आहेत. गोळ्या झाडणारा आमदार मुख्यमंत्रीच गुंड निर्माण करत असल्याचे सांगतो, अशा गुंडाराज सरकारला येथील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. कोरेगावची ही संस्कृती आहे का? असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळत निशाणा साधला. त्यांनी कुणी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करतो म्हणून आमिषाला बळी पडू नका, आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहा, शशिकांत शिंदे तुम्हीही मतदार संघाला वेळ द्या, अशा कानपिचक्याही दिल्या.

    कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गीताई मंगल कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जयंत पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

    आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत जयंत पाटील पुढे म्हणाले, पोलीस स्टेशनमध्ये दोन-तीन लोक बसले असताना अचानक आमदार येतात डांग..डांग करून गोळ्या मारतात. मुख्यमंत्रीच गुंड निर्माण करत असल्याचे तेच सांगतात. म्हणून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशा या गुंडाराज सरकारला येथिल लोकप्रतिनिधिंचा पाठिंबा आहे.

    कोरेगावची ही संस्कृती आहे का? इथले राजकारण साधे, सरळ आहे. स्व. शंकरराव जगताप, डॉ. शालिनी पाटील यांनी प्रतिनिधित्व केले त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादीतून निवडून आले. कोरेगावने आता कुणी जास्त पैसा खर्च केला म्हणून भुलू नये. आमिषाला बळी पडू नये आचार, विचाराला साथ द्यावी शशिकांत शिंदेंनीही मतदारसंघात वेळ देऊन बुथ लेवलला काम करावे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.