जयंत पाटील यांना काँग्रेसचा धक्का, इस्लामपूरात कार्यालयाचे विद्युत मीटर कायमस्वरूपी बंद करण्याची महावितरणकडे मागणी

इस्लामपुरातील कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असणारा वाद आतां नव्या वळणावर पोहचण्याची चिन्हे आहेत.

    इस्लामपूर : इस्लामपुरातील कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असणारा वाद आतां नव्या वळणावर पोहचण्याची चिन्हे आहेत.

    आंदोलन, धरणे, इशाऱ्यांतर शरद पवारांची भेट घेवूनही दोन महिने काहीच हालचाली न झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आमच्या इमारतीमध्ये श्री.चेअरमन,वाळवा तालुका सहकारी दूध संघ या नावे असणारे बेकायदेशीर विद्युत मीटर कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी महावितरणकडे पत्राद्वारे केली आहे.
    शहरातील तहसीलदार कचेरी शेजारील मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालय आमचेच आहे. ते आमच्या ताब्यात मिळावे यासाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवारांना दोन ऑगस्टला दिल्ली येथे भेटून आपली भूमिका मांडली होती.
    वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक प्रदेश काँग्रेस सचिव विजय पवार, काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष (अल्पसंख्याक) शाकीर तांबोळी यांनी भेट घेत या प्रश्नावर स्वतः लक्ष घालावे अशी मागणी केली होती.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करू. इस्लामपूरच्या कार्यालयाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले होते. पण यावर काहीच निर्णय न झाल्याने आज तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी बेकायदेशीर विद्युत मीटर कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी करणारे पत्र महावितरणला दिले आहे.

    आमच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पक्ष कार्यालय आमच्याच मालकीचे आहे. तर १९९९ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस कमिटीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी वापरत आहेत असे म्हणणे काँग्रेस कार्यकर्त्यांचे आहे.