….अखेर जेजुरीकरांच्या लढ्याला आले मोठे यश, विश्वस्तांबाबत होणार महत्त्वाचा निर्णय

  Martand Devsansthan Trustee : जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली. सहधर्मदाय आयुक्तांनी केलेल्या या निवडीवर जेजुरीकरांनी नाराजी व्यक्त केली. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला. दरम्यान, आंदोलकांच्या वतीने सहधर्मदाय आयुक्तांकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी (ता. ७) निर्णय झाला. त्यानुसार आता जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी ११ विश्वस्तांचे मंडळ करण्याची सूचना करण्यात आली आहे.

  जेजुरी मंदिर ट्रस्टवर सात विश्वस्तांची निवड वादग्रस्त
  गेल्या महिन्यात सहधर्मदाय आयुक्तांनी जेजुरी मंदिर ट्रस्टवर सात विश्वस्तांची निवड केली होती. त्यात पाच जणांचा जेजुरीबाहेरील समावेश होता. त्याविरोधात जेजुरी खांदेकरी-मानकरी-ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली जेजुरीकरांनी आंदोलन छेडले होते. विश्वस्तमंडळावर जास्तीत जास्त स्थानिकांचा सहभाग हवा, अशी आंदोलकांची आग्रही मागणी होती. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, जेजुरीत ग्रामस्थांच्या वतीने चक्री उपोषण सुरू केले होते. त्याचा आज १४ दिवस आहे.

  जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी अकरा विश्वस्तमंडळाची नेमणूकीची सूचना
  दरम्यान, सोमवारी (ता. ५) आंदोलकांच्या वतीने सहधर्मदाय आयुक्तांकडे विश्वस्त निवडीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी (ता. ७) सुनावणी झाली. यावेळी आंदोलकांच्या मागणीनुसार जेजुरी मंदिर ट्रस्टवर सातऐवजी अकरा विश्वस्तमंडळाची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी विश्वस्तांनी घटना दुरुस्त करून संख्या वाढवून घ्यायची आहे.

  श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची निवड
  याबाबत आंदोलकांचे कायदेशीर सल्लागार अॅड. अशोक भोसले यांनी माहिती दिली. भोसले म्हणाले, “महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची निवड करण्यात आली होती. यावेळी पाच जण जेजुरीबाहेरील निवडले होते. त्यावर नाराज जेजुरीकरांच्या वतीने पुनर्विचार याचिक दाखल करण्यात आली. आज झालेल्या सुनावणीत आंदोलकांच्या मागणीनुसार विश्वस्तमंडळावर अकरा जणांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी आताच्या विश्वस्तांना घटना दुरुस्ती करावी लागणार आहे.