सराफी दुकान फोडून २८ लाखांचे दागिने लुटणारा जेरबंद, इंदापूर पोलिसांनी झारखंडमधून केली अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

इंदापूर शहरातील (Indapur City) खडकपूरा येथील साई समर्थ ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून तब्बल २८ लाख रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याच्या प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी झारखंड येथून अटक केली आहे.

  ‘कानून के हाथ लंबे होते हैं’….ही म्हण फक्त चित्रपटांपुरती मर्यादित नाही तर ती सत्यात इंदापूर (Indapur) पोलिसांनी (Police) खरी करून दाखवली आहे. इंदापूर शहरातील (Indapur City) खडकपूरा येथील साई समर्थ ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून तब्बल २८ लाख रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याच्या प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी झारखंड येथून अटक केली आहे. अब्दुल दालिम नजरूल शेख (वय ३२, रा. पियारपूर राजमहल जि. साहेबगंज, झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील आरोपीला इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील खडकपूरा येथील साई समर्थ ज्वेलर्स दुकान २७ एप्रिल रोजी रात्री दहा ते २८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान फोडण्यात आले होते. यासंदर्भात दुकानचे मालक राहुल महादेव शहाणे (वय ३७) यांनी २८ लाख रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

  चोरीसाठी केला आंबे विक्रीचा बनवा

  त्यानंतर इंदापूर पोलिसांनी घटनास्थळावरून सापडलेल्या गॅस सिलेंडर, गॅस कटर यांसह सीसीटीव्ही फुटेज व इतर धाग्या दोऱ्यांच्या साह्याने आरोपींची ओळख पटवून शोध सुरू केला. यावेळी पोलिसांना लक्षात आले की, आरोपींनी आंबे विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानाच्या शेजारील गाळ्यात तळ ठोकला होता. या गुन्ह्यात इतर दोन आरोपी असल्याचे तपासात पुढे आले व ते झारखंड येथे असल्याचे निष्पन्न झाले. परंतू, पोलीस मागावर असताना आरोपी हे सतत पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. मात्र १६ तारखेला इंदापूर पोलिसांच्या पथकाने झारखंड पोलिसांच्या मदतीने एका आरोपीला पकडून जेरबंद केले आहे. आरोपीला मंगळवारी (दि.१७) इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  कारवाईत या पथकाचा समावेश

  ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस नाईक सलमान खान, विशाल चौधर, मोहन आनंदगावकर यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करत आहेत.