
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केले आहेत. दि.९ ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.
कुर्डुवाडी : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केले आहेत. दि.९ ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. याबाबत संगीता राजाराम ठाकूर (रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह दि. ९ आॅगस्ट रोजी कल्याण ते मुंबई बोगी नं. ए ०३ सीट क्र १९, २१ वरुन प्रवास करत हाेते. फिर्यादीस मोहोळ येथे जाग आली असता, फिर्यादीने डोक्याखाली घेतलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी लागलीच पतीला उठवून पर्सचा शोध घेत पर्समध्ये ठेवलेल्या मोबाइलवर फोन केला असता मोबाइलचा आवाज आला. त्यानुसार शोध घेतला असता बर्थखाली पर्स सापडली. पर्समधील मोबाइल मिळाला.
मात्र त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६४ हजार ४९९ रुपयांचे २५.६६० ग्रॅम मंगळसूत्र, ३१ हजार ४८५ रुपयांची ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ३७ हजार ६५४ रुपयांची ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण २ लाख ३३ हजार ५३८ रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.