‘राहुल नार्वेकर हे ध्रुतराष्ट्र’ आमदार अपात्रता सुनावणीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्रमक घणाघात

नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर ताशेरे ओढले असून अजित पवार गटावर घणाघात केला आहे.

  मुंबई – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा (NCP MLA Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष (NCP) हा अजित पवार (Ajit Pawar) गटाचाच असून पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार यांचेच असल्याचे देखील राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर ताशेरे ओढले असून राहुल नार्वेकर यांना ध्रुतराष्ट्र अशी जहरी टीका केली आहे.

  राहुल नार्वेकर यांचा निकाल हास्यास्पद 

  राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांबाबत राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या देशामध्ये कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे कोणाला शिकायचे असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिकवणी लावावी. राहुल नार्वेकर यांचा निकाल हास्यास्पद असून ते परिशिष्ट 10 नेमकं तयार कशासाठी केलं आहे. आयाराम गयाराम नावाची पद्धत रोखण्यासाठी हेच बनवण्यात आले आहे. पण आमचे अध्यक्ष म्हणतात की हे माझं कामचं नाही. माझ्या स्कॉपमध्येच नाहीये, मग दोन वर्षे काय अंडी उबवत होता का ? ही काय थट्टा मस्करी लावली आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणचं कसं वाटोळं लावलं जात आहे याचं सुंदर उदाहरण म्हणजे आजचं निकाल वाचन होतं,” असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

  राहुल नार्वेकर हे ध्रुतराष्ट्र

  “निवडणूक आयोगाने सांगितले होते की 30 जूनचा विचार करता अजित पवार यांचे झालेलं अध्यक्षपद हे असंविधानिक आहे, हे नार्वेकर यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. 1 जुलैला अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून विद्यमान सरकार भ्रष्टाचारी आहे असा आरोप करणारे ट्वीट लिहिले होते. 3 तारखेला त्यांनी उत्तर दिलं तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तर अजित पवार म्हणाले शरद पवारचं ना ! तुम्हाला काहीच दिसत नसेल तर तुम्ही ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहात काय ? असे ध्रुतराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करतील. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पक्ष मोडायचे आणि जोडायचे, कायदे मोडायचे आणि तोडायचे आणि परत मी त्या खेळातलाच नाही असे म्हणायचे हे अत्यंत हास्यास्पद आहे,” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  “राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्य़ा निकालाचे जे वाचन केले त्यावरुन कायद्याची पायमल्ली करण्यात आली आहे. कायदा थिल्लर म्हणून गणला गेला आहे. हे सर्व महाराष्ट्रामध्ये गैर होत आहे.” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड हे स्वतः निकालाच्या या वाचनावेळी सभागृहामध्ये उपस्थित होते.