Jitendra Awhad
Jitendra Awhad

लोकसभा निवडणुकीवेळी तुम्हाला भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक असल्याचे सांगतील, खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल ते माहिती नाही. पण मतदारांनो, तुम्ही भावनिक होऊ नका, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना डिवचले होते.

    मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी तुम्हाला भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक असल्याचे सांगतील, खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल ते माहिती नाही. पण मतदारांनो, तुम्ही भावनिक होऊ नका, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना डिवचले होते. अजित पवार यांच्या या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार यांचे हे विधान चीड आणणारे आहे, तितकंच संतापजनक आहे. आपल्या काकाची मृत्यूची वाट पाहणे हे काय राजकारण आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

    यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची शाळा घेतली. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये, असे सांगताना व्यावहारिकरणे गोष्टींना बघा असा सल्ला अजित पवारांनी दिला. आगामी निवडणूक काळात काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे, असे सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? हे माहिती नाही, असे वक्तव्य करून अजित पवारांनी शरद पवार यांना डिवचले. त्यांच्या याच विधानावर आव्हाड यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

    ‘अजित पवारांचे विधान माणुसकीला न शोभणारे’

    बारामतीत कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार यांनी हद्द ओलांडली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची याचना करणे हे कितपत योग्य आहे. आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणे हे काय राजकारण आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच असे विधान करणे हे माणुसकीला शोभणारे आहे का याचा विचार अजित पवार यांनी करावा, असे आव्हाड म्हणाले. महाराष्ट्राला पण कळेल की आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघणारा काय माणूस आहे हा, बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील, अशा शब्दांत आव्हाडांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.