लाचखोर तहसीलदार मीनल दळवी यांची २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने (District Session Court) २८ नाेव्हेंबरपर्यंत लाचखाेर तहसीलदार मीनल दळवी (Meenal Dalvi) यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत (Judicial Custody To Meenal Dalvi) केली आहे. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी तातडीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.

  अलिबाग: अलिबागच्या लाचखाेर तहसीलदार मीनल दळवी (Meenal Dalvi) यांची पाेलीस काेठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने (District Session Court) २८ नाेव्हेंबरपर्यंत दळवी यांची रवानगी न्यायालयीन काेठडीत (Judicial Custody To Meenal Dalvi) केली आहे. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी तातडीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सरकार पक्षाने आपले म्हणणे मांडले आहे. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी राखून ठेवली आहे. त्यामुळे दळवी यांना अलिबागच्या जिल्हा कारागृहात आजची रात्र व्यथीत करावी लागणार आहे.

  तहसीलदार मीनल दळवी यांना दाेन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी नवी मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करुन १२ नाेव्हेंबर राेजी अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते. दळवी यांच्यासह त्यांचा एजंट राकेश चव्हाण हा देखील होता. न्यायालयाने दाेघांचीही दाेन दिवसांसाठी म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली हाेती. त्याची मुदत संपल्याने दळवी आणि चव्हाण यांना पुन्हा आज न्यायालयात हजर करण्यात आले.

  आज दुपारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दळवी आणि त्यांचा एजंट राकेश चव्हाण याला २८ नाेव्हेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. आराेपींच्या वकीलांनी तातडीने जामीनासाठी अर्ज दाखल केला मात्र न्यायालयाने आज सुनावणी घेतली नाही. तो राखून ठेवला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दळवी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याने त्यांचा आजचा मुक्काम अलिबागच्या जिल्हा कारागृहात असणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पाेलीस उपअधिक्षक ज्याेती देशमुख यांनी नवराष्ट्रशी बाेलताना दिली.

  काय आहे प्रकरण ?
  अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राची नोंदणी करण्याचे प्रकरण तहसीलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. या बक्षिसपत्राच्या नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसीलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती दाेन लाख देण्याचे ठरले होते. दळवी यांचा एजंट राकेश चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास दळवी यांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी खोत यांच्याकडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने राकेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याने तहसीलदार दळवी यांचे नाव सांगितल्याने पथकाने तहसीलदारांना गोंधळपाड्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  त्यानंतर १२ नाेव्हेंबर राेजी दुपारी दीड वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुग्णालयातून अलिबाग पोलीस ठाण्यात दोघाही लाचखोरांना आणले. तिथे अटकेची नोंद केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत न्यायालयात हजर करण्यात आले. शनिवारी सुट्टी असतानाही विशेष सत्र न्यायाधीश अशाेककुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी दोघांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

  दळवींकडे काेट्यवधी रुपयांचे घबाड
  दळवी यांच्या मुंबई-विक्राेळी येथील घरातून तब्बल एक काेटी रुपयांहून अधिक रोख रक्कम सापडली. या ठिकाणी मुंबईतील पथकाने कारवाई केली तर अलिबाग येथे रायगड पथकाने छापा टाकला. अलिबागच्या घरातून सुमारे ६० तोळे सोने तपास यंत्रणांना सापडले होते.