राजकीय गुन्ह्यावरून काँग्रेसमध्ये जुंपली, गटबाजी आता उघड; आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

काँग्रेसमधील गटबाजी आता उघड झाली आहे. सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या दाेन माजी शहराध्यक्षांनी नुकतीच केली हाेती. तर ही पक्षाची अधिकृत भुमिका नसल्याचा दावा शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.

    पुणे : शहर (Pune Congress) काँग्रेसमधील गटबाजी आता उघड झाली आहे. सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या दाेन माजी शहराध्यक्षांनी नुकतीच केली हाेती. तर ही पक्षाची अधिकृत भुमिका नसल्याचा दावा शहराध्यक्ष अरविंद शिंदेे  यांनी केला आहे.

    शहराध्यक्ष पदाची सुत्रे शिंदे यांनी स्विकारल्यानंतर त्यांच्या विराेधातील गट सक्रीय झाला आहे. गेल्या काही महीन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने काॅंग्रेसमधील गटबाजी दिसुन येत हाेती. परंतु राजकीय आंदाेलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या भुमिकेवर शिंदे यांनी थेट हल्ला केला आहे.

    नुकतेच प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर आदींच्या शिष्टमंडळाने शनिवारी रितेश कुमार यांनी भेट घेवून मागणीचे निवेदन दिले हाेते. करोना काळात सर्वसामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी अद्याप सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेतलेले नाहीत, असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले हाेते.

    या पार्श्वभुमीवर शिंदे यांनी साेमवारी पाेलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी राजकीय गुन्हे सरसकट माफ करण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे गरजेचे अाहे. काेराेना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आवश्यक आहे, त्या मागणीस पक्षाचा पाठींबा आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपायुक्तामार्फत समिती गठीत केली जावी, त्याची पडताळणी करावी. आमच्या पक्षाच्या काही पदाधिकारी, गटांनी निवेदनाद्वारे केलेली मागणी पक्षाची अधिकृत भुमिका नाही. पक्षाची भुमिका ही शहराध्यक्ष यांच्या लेटरहेड आणि स्वाक्षरीने असेल तरच ती ग्राह्य धरावी असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.