उद्धव ठाकरेची सभा घ्याच, आम्हाला शिव्या घाला, मग मताधिक्यात वाढ होईल – आ. नितेश राणे

उद्धव ठाकरे गद्दार आणि बेईमान माणूस, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खरा चेहरा दाखविला; वडिलांचे, भावाचे झाले नाहीत ते शिवसैनिकांचे होऊ शकत नाहीत.

    कणकवली : कणकवलीत आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी चांगलाच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हा गद्दार आणि बेईमान माणूस आहे. ज्यांनी आपल्या वडिलांना सोडले नाही. रक्ताच्या भावाशी बेईमानी केली. स्व. बाळासाहेबांच्या विचारांशी, त्यांच्या शिवसैनिकांशी बेईमानी केली. मराठी माणसासोबत बेईमानी केली. त्यांचा खरा चेहरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. एका तोंडाने शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचे म्हणून सांगायचे आणि घरातील माणूस मुख्यमंत्री होत नसेल तर आपल्याच शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ द्यायचे नाही,असे कृत्य उद्धव ठाकरे यांनी केले असल्याची घनाघाती टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.

    पुढे ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीवर संशयाने पाहून ही संजय राऊत यांची रोजची सवय झाली आहे. निवडणूक आयोगाला सल्ले आणि त्यांचेवर आरोप करून उगाचच अकलेचे तारे संजय राऊत तोडत आहे. मतदार कधी मतदान करतात, हे ज्याला माहीत नाही. त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. दिशा सालीयनचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट योग्य वेळी का आला नाही. हा प्रश्न आम्ही विचारायचा का? उगाच अकलेचे तारे तोडू नको. मतदान कस असत हे आधी शिकून घेतलं पाहिजे. फडणवीस यांनी फुसकाबार बोलण्याचा अधिकार चायनीज फटाका जो वाजत नाही त्या संजय राऊत यांना नाही. याची वात पेटवायची कुठुन आणि रॉकेट सुटणार कुठून हा प्रश्न संजय राऊत यांना बघितलं की पडतो. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. जो विषय काल फडणवीस यांनी सांगितला. त्यावरून हे समजत की उद्धव ठाकरे किती नीच वृत्तीचे आहेत. उद्धव ठाकरे किती स्वार्थी आहे. ह्याला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा घाणेरड्या वृत्तीचा चेहरा फडणवीस यांनी समोर आणला, असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत वातावरण आमच्यासाठी सकारात्मक आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाप्रमाणे कणकवलीत येऊन जाहीर सभा घ्यावी. ना. नारायण राणे आणि आम्हाला, भाजप नेत्यांना शिव्या द्याव्यात मग आमचे एक लाख मतदान वाढणार हे नक्की आहे. यापूर्वी सुद्धा तसेच केले होते. माझ्या विधानसभेला तेव्हा ५० हजार मते वाढली होती. ठाकरेंनी आम्हाला शिव्या दिल्या म्हणून जनतेने रागाने आम्हाला मते दिली होती. यावेळी सुद्धा तसेच होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेण्यासाठी यावे हवं तर मी त्यांना हेलिकॉप्टर करून देतो, रेल्वेचे तिकीट काढून देतो अशी उपरोधिक टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

    उद्धव ठाकरे बेईमान माणूस आहे, गद्दार आहे. बावनकुळे जे म्हणतात ते खरं आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि कोण कोणाच्या हाताखाली बाहुली आहे. हे सिल्वर ओक वर हुजरेगीरी करणाऱ्यांनी सांगू नये. सिल्वर ओकवर समजेल बाहुली कशी नाचते. हयाचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.