कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, खो-खो स्पर्धेसाठी विजेत्यांना मिळणार एक कोटी : अजित पवार

राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रात होणाऱ्या कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि खो-खो स्पर्धेतील विजेतेपदासाठी असणारी ७५ लाखांची रक्कम वाढवून एक कोटी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरात केली. 

  इस्लामपूर : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रात होणाऱ्या कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि खो-खो स्पर्धेतील विजेतेपदासाठी असणारी ७५ लाखांची रक्कम वाढवून एक कोटी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इस्लामपुरात केली.

  २४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व्हॉलीबॉल इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

  या स्पर्धेत विविध राज्यातील पुरुषांचे २२, तर महिलांचे २० संघ आपला खेळाचे प्रदर्शन करणार आहेत. या स्पर्धेतून भारताचा संघ निवडला जाणार असून इस्लामपूर येथील पोलीस कवायत मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.

  यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेची रक्कम वाढवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री आणि सर्व मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल. शालेय वयापासून पालकांनी मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावा. तालुका क्रीडा संकुलाला ५ कोटी, जिल्हा संकुलाला २५ कोटी, विभागीय संकुलाला ५० कोटींचा निधी राज्य सरकारच्यावतीने देत आहोत.

  राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापूर्वीच आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अहर्तानुसार आम्ही वर्ग १ व वर्ग २ च्या नोकरीत संधी देत आहोत. यामुळे चांगले खेळाडू घडतील.

  इस्लामपुरातील मैदानावर प्रतीक पाटील यांनी व्हॉलीबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाची चुणूक दाखवत राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आणली त्याचे कौतुक आहे. त्यांनी नेटके संयोजन केले आहे.

  प्रतिक पाटील म्हणाले, इस्लामपूर शहर व सांगली जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल खेळाला मोठी परंपरा व इतिहास आहे. एक काळ असा होता, भारतीय व्हॉलीबॉल संघात निम्मे खेळाडू इस्लामपूर व परिसरातील होते. वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांनी त्याकाळी कुस्ती व कबड्डीसारख्या खेळांना मोठे प्रोत्साहन दिले आहे. तर राज्याचे जलसंपदा मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कबड्डी,कुस्ती, व्हॉलीबॉल व क्रिकेटसह सर्वच खेळांना सातत्याने पाठबळ देत आहेत. वाळवा तालुक्यातील व्हॉलीबॉलसह सर्वच खेळांची वैभवशाली परंपरा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.