१७ सायकलपटूंची तब्बल १२०० किमीची वारी, कल्याणकर समाजसेवेच्या वेडात

विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, पोलीस आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

    कल्याण : समाजाप्रती असणारी आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी कल्याणातील १७ सायकलपटू यावर्षीही तब्बल १ हजार २०० किलोमीटरच्या सायकलवारीसाठी आज पहाटे रवाना झाले. कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून कर्नाटकामधील कूर्ग येथे निघालेल्या या सायकलपटुंना केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी झेंडा दाखवत रवाना केले. या सायकलवारीच्या माध्यमातून जमा झालेला निधी पैशांअभावी उपचार रखडलेल्या, वैद्यकीय सेवा मिळू न शकलेल्या गरजू कुटुंबीयांना दिला जाणार आहे.

    कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे ताहीर शेख यांच्या पुढाकाराने कल्याणातील एक एक सायकलपटू एकत्र येत गेले आणि मग त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सायकलवारीला प्रारंभ झाला. गेली चार वर्षे हे सर्व सायकलपटू सामाजिक भान ठेवत देशाच्या विविध राज्यातील भागात सायकल रॅली काढत असल्याची माहिती सहभागी सायकल पटू डॉ. रेहनूमा एतोशामुद्दिन यांनी दिली.

    विशेष म्हणजे या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक, पोलीस आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. या सर्व १७ सायकल पटुंसमोर पुढील ७ दिवसांत कल्याण ते कूर्ग हे तब्बल १ हजार २०० किलोमीटर अंतर कापण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे दररोज साधारणपणे पावणे दोनशे किलोमीटरचे अंतर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही या सायकल पटुंतर्फे सांगण्यात आले. दरम्यान या सायकलपटुंचा उत्साह वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील विविध सामाजिक संस्था आणि त्यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष असून याआधीही सामाजिक बांधिलकी जपत ही सायकलवारी संपन्न झाली आहे.