चोरट्याला पकडण्यासाठी वीट भट्टीवर मजूर बनले पोलीस, चोरीच्या पैशातून आलीशान बंगला आणि महागड्या गाड्या घेतल्या विकत

राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलीस आणि मीराभाईंदर क्राईम ब्रांचही लागल्या होत्या. मात्र त्यांना यश आले नाही. मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक कंजहित रायपूर गावात पोहचले.

    डोंबिवली : लोकांच्या बंद घरात डल्ला मारुन स्वत:च्या गावात आलीशान बंगला तयार केला. घरासमोर महागड्या गाड्या उभ्या केल्या. जवळपास २२ गुन्हयात फरार असलेल्या सराईत चोरटा राजेश राजभर याला मानपाडा पोलिसांनी आजमगड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अर्धा किलो सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे राजेशला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस वेशांतर करुन वीटभट्टीवर काम करावे लागले.

    डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरात चोरी झाली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस निरिक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनिल तारमळे, प्रशांत आंधळे, अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरु केला. सराईत चोरट्याचा सीसीटी टीव्ही फूटेज पोलिसांना प्राप्त झाले होते. पोलिसांनी माहिती मिळाली की, सराईत चोरट्याचे नाव राजेश राजभर असे आहे. तो आजमगड जिल्ह्यातील लालगंज तहसीलमध्ये कंजहीत रायपूर या गावात राहतो.

    राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलीस आणि मीराभाईंदर क्राईम ब्रांचही लागल्या होत्या. मात्र त्यांना यश आले नाही. मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक कंजहित रायपूर गावात पोहचले. पोलिसांना माहिती मिळाली की, राजेश राजभर हा या गावात राहतो. परंतू तो घरात नाही. त्याचे घर पाहून पोलीस हैराण झाले होते. त्याने आलिशान घर तयार केले होते. त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्या उभ्या आहेत. दोन दिवस तीन पोलीस राजेशच्या शोधात होते.

    हे तीन्ही पोलीस दोन दिवस वीट भट्टीवर काम करीत होते. त्यांची नजर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. अखेर गावाच्या दिशेने येताना राजेश राजभर पोलिसांच्या हाती लागला. याबाबत राजेश राजभर याच्या विरोधात आंत्ता पर्यंत २२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, शीळफाटा या परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहे. या आधीही त्याने मोठया प्रमाणात चोरी केली होती. त्याच्याकडून अर्धा किलो सोने हस्तगत केले आहे.