कल्याण पूर्वेतील वाढत्या गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुले जबाबदार

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा म्हात्रे नगर परिसरात एका टपरी चालकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

    कल्याण क्राईम : गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारची कारवाई केली जाते. काही महिन्यात पोलिसांनी कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारी थांबविण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. परंतु गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. अल्पवयीन असल्याने कोर्टाकडून लवकर सुटका होते. त्यानंतर ही मुले खंडणी आणि अन्य कारणाकरीता लोकांसोबत गैर प्रकार करतात.

    कल्याण पूर्वेतील चिंचपाडा म्हात्रे नगर परिसरात एका टपरी चालकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशा प्रकारे काही तरुण पानटपरी चालकास मारहाण करुन दुकानाची तोडफोड करताना दिसत आहेत. दुकानदार पवन चौरसिया यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तरुणांच्या विरोधात लूटीचा आणि हाणामारीचा गुन्हा दाखल केला.

    जेव्हा पोलिसांचा तपास सुरु झाला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. दुकानदारासोबत भांडण करुन मारहाण करणारे चारही मुले अल्पवयीन होती. ज्यांनी दोन हजार रुपयांकरिता दुकानदाराला मारहाण केली. यापैकी दोन मुले काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांडात सामील होती. एका कंत्राटदारावर झालेल्या हल्ल्यात या मुलांचा समावेश होता. अल्पवयीन असल्याने त्यांची सुटका झाली होती. सुटका झाल्यावर या मुलांनी पुन्हा तोच मार्ग निवडला. सातत्याने या मुलांकडून गुन्हेगारी घटना घडत आहेत. पोलीस करणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे.