रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी गजाआड, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

रेल्वे स्टेशन वरील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरत होते.

    कल्याण : रेल्वे प्रवासात ,रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल हातचलाखीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे आहेत. या दोघांकडून चोरलेले १७ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून आत्तापर्यंत नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. या दोघांनी आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर अशा गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रेल्वे स्टेशन वरील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरत होते. त्यातच १४ तारखेला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल झाली कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास सुरू केला. मोबाईल चोरी करणाऱ्या या दोन चोरट्यांना पोलिसांनी अंबरनाथ येथून अटक केली. अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन चोरट्यांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल १७ मोबाईल या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले आहेत.