१२ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या भाऊ बहिणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोळशेवाडी पोलिसांनी अजय थापा व सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    कल्याण-डोंबिवली : कल्याण पूर्वमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे केले. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईल वर व्हिडिओ बनवला. पीडित मुलीने ही बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

    सदर बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते. याच परिसरात अजय थापा आणि सपना थापा हे दोघे भाऊबहीण राहतात. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघाची नजर तिच्यावर पडली. अजयने या मुली सोबत अश्लील चाळे केले. अजयचे अश्लील चाळे सुरू असताना त्याची बहीण सपना हिने हा किळसवाना प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हकीकत घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी अजय थापा व सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.