घराच्या मोबदल्यात घरे, जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला अन्यथा रस्ता होऊ देणार नाही अशी रिंग रोड बाधितांची मागणी

कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी समस्येच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

    कल्याण : कल्याण शहरात दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या रिंग रोड मध्ये अनेक ग्रामस्थांची घरं, जमिनी बाधित होत आहेत. या बाधित शेतकऱ्यांनी घरांच्या बदल्यात घरे तर जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला देण्यात यावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर घर आणि जमिनीचा ताबा सोडणार नाही, रिंग रोड प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा देखील ग्रामस्थांनी महापालिकेला दिलाय. त्यामुळे महापालिका या मोबदल्यालाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

    कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी समस्येच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या रिंग रोड मुळे टिटवाळा पासून ते डोंबिवली पर्यंतचा प्रवास अवघ्या काही मिनिटात करता येणार आहे. या रिंग रोड साठी महापालिकेकडून भूसंपादन सुरू आहे. दुर्गाडी ते गांधारी दरम्यान शेतकऱ्यांची घरे व जमिनी बाधित होत आहेत. या बाधित शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या शहराच्या विकासाला विरोध नाही, रिंग रोड मुळे शहराचा विकास होणार हे चांगलच आहे. मात्र आमच्या पिढ्यान पिढ्या या गावात गेलेल्या आहेत. या रिंग रोडचे काम करण्यासाठी आमचे घरे, जमिनी बाधित होतात घरांच्या मोबदल्यात आम्हाला महापालिकेने चांगल्या ठिकाणी घरात आहेत तसेच जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे.

    जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही घर आणि जमिनीचा ताबा महापालिकेला देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शिवसेनेचे युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी दुर्गाडी ते मोठागाव दरम्यानच्या बाधितांना चार टीडीआर अशी मागणी केली. तर दुसरीकडे दुर्गाडी ते गांधारी दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांनी घरांच्या मोबदल्यात घरी व जागेच्या मोबदल्यात रोख मोबदल्याची मागणी केली. त्यामुळे आता रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा तिढा सोडवण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे. आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.